समाजकल्याण शिष्यवृत्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत

रत्नागिरी:- समाज कल्याण विभागामाफत देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 30 एप्रिलनंतर मुदतवाढ देणार नसल्याचे उच्च शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता या योजना राबविल्या जातात. यासाठी विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागतो. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी भरल्या जाणार्‍या अर्जांपैकी अनेक अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे 30 मार्चवरून ही मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. परंतु, यानंतर ही मुदत वाढविणार नसल्याचे उच्च शिक्षण संचालनालयाने सांगितले आहे. त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत समाज कल्याण विभागाकडे शिष्यवृत्ती अर्ज जमा करावे लागणार आहेत. त्यानंतर हे अर्ज जमा करून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील प्रोफाईलवर लॉगइन करून आपल्या अर्जाची स्थिती तपासावी, आधार खाते बँक अकाऊंटशी संलग्न नसल्यास ते संलग्न करावे, अशा सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज महाविद्यालय तसेच विभागीय स्तरावर दररोज निकाली काढण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत. अर्ज प्रलंबित राहून विद्यार्थ्याचे नुकसान झाल्यास, ज्या स्तरावर अर्ज प्रलंबित आहे त्यानुसार उच्च शिक्षण सहसंचालक, विद्यापीठाचे कुलसचिव व महाविद्यालयांचे प्राचार्य जबाबदार राहणार असल्याचे उच्च शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.