शेतकऱ्यांकडून बाजार समितीकडे 37 टन काजू बी तारण

रत्नागिरी:- काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर उत्पादक शेतकर्‍यांकडील काजूसाठी शेतमाल तारण कर्ज योजना जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविण्यात येते. बाजार समितीकडे 37 टन काजू बी तारण ठेवण्यात आले आहे. बाजारातील दराच्या 75 टक्क्यांप्रमाणे काजू बीसाठी 85 रुपये प्रमाणे 32 लाख रुपये कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.

कृषी पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेमुळे जिल्हातील शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाच्या काढणी हंगामात कमी भावाने विक्री न करता तो शेतमाल बाजार समितीच्या गोदामामध्ये तारणात ठेवून शेतकर्‍यांना तारण कर्जाच्या स्वरूपात सुलभ आणि त्वरित कर्ज उपल्बध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजने अंतर्गत शेतकर्‍यांनी उत्पादित केलेला शेतमाल बाजार समितीच्या गोदामात तारण योजनेअंतर्गत ठेवण्यात येतो.

हंगामाच्या कालावधीत शेतीमाल एकाच वेळी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला जातो. त्यामुळे शेतमालाचे बाजारभाव कमी होतात. शेतमालास योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होते. मात्र, काढणी हंगामात शेतमालाची साठवणूक करुन तो काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीस आणल्यास त्या शेतमालास जादा बाजारभाव मिळू शकतो. तसेच शेतकर्‍यांस हंगामाच्या वेळी असणारी आर्थिक निकड विचारात घेऊन त्यांना या गरजेच्यावेळी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.

गतवर्षी लॉकडाऊन काळात काजू बीचे दर घसरले होते. बाजार समितीने 56 रुपये किलोने तारण ठेवून शेतकर्‍यांना कर्ज दिले होते. 93 टन काजू बी तारण ठेवण्यात येऊन 53 लाख रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात शेतकर्‍यांनी काजू बीची विक्री केली असता किलोला 120 ते 130 रुपये किलो दर प्राप्त झाला होता. अडीचपट दर प्राप्त झाल्याने शेतकर्‍यांना त्याचा फायदा झाला होता. यावर्षीही शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

एप्रिल महिन्यातच तारण योजनेचा प्रारंभ झाला असून, लांजा येथील शेतकर्‍यांनी 37 टन काजू तारण ठेवला आहे. त्यांना 32 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. सध्या बाजारात काजू बीचा दर 114 रुपये असून, शेतमाल तारण योजनेंतर्गत 75 टक्के दराप्रमाणे कर्जाची रक्‍कम वितरित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय आयरे यांनी केले आहे.