रत्नागिरीत नियम पाळून साजरा झाला राम जन्मोत्सव सोहळा

रत्नागिरी:- कोरोना महामारीचा फटका सलग दुसर्‍या वर्षी राम जन्मोत्सव सोहळ्याला बसला आहे. येथील प्राचीन राममंदिरामध्ये फक्त निवडक 5 माणसांमध्येच राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. अन्य उत्सव, रथोत्सव रद्द करण्यात आला. भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते. सकाळी 7 वा. पूजा, 56 भोग नैवेद्य, आरती आणि जन्माच्या वेळेला कीर्तन असा कार्यक्रम 5 माणसांमध्ये करण्यात आला.

जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी दुपारी 12.39 वा. राम जन्मोत्सव साजरा होतो. दिवसभर विविध मंडळांची भजने होतात. राममंदिरातून सायंकाळी रामाच्या रथाची मोठी मिरवणूक काढण्यात येते. चार तास चालणार्‍या या मिरवणुकीत हजारो लोक सहभागी होतात. त्यात श्रीरामाच्या जीवनावर आधारित विविध देखावे, ढोल-ताशांचा गजर केला जातो. परंतु गेल्या वर्षी आणि याही वर्षी वाढत्या कोरोनामुळे मिरवणूक रद्द केली आहे.

रत्नागिरीत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्रीराम मंदिराला मोठी परंपरा आहे. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी (कै.) भिकाजी बल्लाळ रहाळकर यांनी हे मंदिर उभारले. रहाळकर हे बडोद्याच्या श्रीमंत गायकवाड महाराजांकडे दिवाण होते. त्यांच्या प्रदीर्घ निष्ठापूर्वक सेवेचे प्रतीक म्हणून सेवानिवृत्तीच्या समयी श्रीमंत महाराजांनी त्यांना रामपंचायतनाच्या मूर्ती भेट म्हणून दिल्या. महाराजांच्या दरबारात उच्च पदस्थ कारभारी (कै.) धामणस्कर यांच्या सांगण्यावरून त्यांनी रत्नागिरी शहरात सन 1835 मध्ये हे मंदिर उभारले. मंदिराचा जीर्णोद्धार 1897 मध्ये झाला. 1936 मध्ये नवीन मूर्ती स्थानापन्न झाल्या आणि 2008 मध्ये या मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार करण्यात आला आहे. नव्याने स्थानापन्न झालेल्या संगमरवरी मूर्ती आकर्षक आहेत.