कोकणातील 32 हजार 139 विद्यार्थांना थेट अकरावी प्रवेश

रत्नागिरी:- राज्य शिक्षण मंडळ आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीची परिक्षा रद्दचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे कोकण विभागातील 32 हजार 139 विद्यार्थी परिक्षा न देताच अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.

कोरानाची दुसरी लाट संपूर्ण देशात पसरली आहे. त्याचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात आहे. गतवर्षीपासून कोरोनातील आपत्तीमुळे शैक्षणिक वर्ष अडचणीत आले होते. ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून काही महिने शाळा सुरु होत्या. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात वर्ग सुरु झाले. त्यालाही अल्प प्रतिसाद मिळाला होता. परिक्षांची वेळ आली त्याचवेळी पुन्हा कोरोनाने डोक वर काढले आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव सुरक्षीत ठेवण्यासाठी राज्य शासनाने दहावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचे लेखी आदेश कोकण बोर्डाकडे प्राप्त झालेले नाहीत; मात्र त्याची अंमलबजावणी यंदा निश्‍चित होणार आहे. त्यामुळे दहावीतील सर्वच विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश दिला जाणार आहे. परिक्षा न घेताच विद्यार्थी पास होणार असले तरीही त्यांचे त्यांच्या मुल्यांकनाबाबतचे धोरण अद्यापही शिक्षण मंडळाने जाहीर केलेले नाही. याच अंमलबजावणी झाल्यास 32 हजार 139 विद्यार्थी पास होणार आहे. जिल्ह्यात 114 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार होती. त्यात 560 पुन्हा बसलेले तर 31 हजार 579 नियमित विद्यार्थी यांचा समावेश आहे. त्यात रत्नागिरीतून 21 हजार 378 तर सिंधुदुर्गमधून 10 हजार 201 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत.