रत्नागिरी, चिपळूण तालुक्यातील भूजल पातळी घटली 

जिल्ह्याची सरासरी पातळी 0.14 मीटर

रत्नागिरी:- गेले महिनाभर उन्हाचा कडाका वाढला असून त्याचा परिणाम भूजल पातळीवर होऊ लागला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस आलेल्या अहवालानुसार मागील पाच वर्षांच्या सरासरीनुसार चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यातील पाणी पातळीत किरकोळ घट दर्शवते. जिल्ह्याची सरासरी पातळी 0.14 मीटर इतकी आहे.

यंदा मोसमी पाऊस उशिरापर्यंत राहील्यामुळे पाणीटंचाईची तिव्रता कमी राहील असा अंदाज होता. यावर्षी पहिला टँकर उशिराने धावला. अजुनही टँकरची मागणी करणार्‍या गावांची संख्या कमी आहे. भुजल पातळीसह मे महिन्यापर्यंत टंचाईची स्थिती काय राहील याचा अंदाज घेण्यासाठी भुजल विभागाकडून मार्चच्या अखेरीस सर्व्हेक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून मागील पाच वर्षातील सरासरी आकडेवारी 0.14 मीटरने वाढली आहे. मार्च 2021 मध्ये केलेेल्या सर्व्हेक्षणात जिल्ह्यातील सरासरी पातळी 6.10 मीटर आहे. भुजल पातळी व्यवस्थित असल्याने टंचाईची तिव्रता कमी राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे; मात्र काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार टँकरची गरज भासू शकते. यावर्षी उन्हाचा कडाका चांगलाच जाणवत आहे. मार्च महिन्यात पारा 38 ते 40 अंशापर्यंत काही काळ स्थिर होता. एप्रिल महिन्यातही तीच परिस्थिती असून जसजसा उन्हाचा कडाका वाढत जाईल तशी टँकरची मागणीत भर पडेल असा अंदाज आहे. जिल्ह्यात सध्या 12 गावातील 14 वाड्यांमध्ये सहा टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. त्यात रत्नागिरी, खेड, लांजा, चिपळूण आणि मंडणगड तालुक्याचा समावेश आहे. गतवर्षी पाणीपुरवठा करणार्‍या गावांची संख्या दुप्पट होती.