कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक प्रभाव

रत्नागिरी:- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सर्वाधिक प्रभाव रत्नागिरी तालुक्याला जाणवत आहेत. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत 4 हजार 248 रुग्ण सापडले असून त्यातील 3 हजार 277 बरे झाले आहेत. सध्या 971 रुग्ण उपचाराखाली आहे. गेल्या आठ दिवसात तालुक्यात सरासरी शंभर रुग्ण सापडत आहेत.

जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असल्यामुळे रत्नागिरी शहर आणि तालुक्याला फार महत्त्व आहे. जिल्ह्याची प्रमुख सर्वच कार्यालये रत्नागिरीत आहेत. परजिल्ह्यातील लोकांसह कानाकोपर्‍यातील अनेकजण परवानग्यांसह शासकीय कामांकरता ये-जा करत असतात. औद्योगिक क्षेत्रही मोठे असून अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. त्याचा परिणाम कोरोना वाढीला पुरक ठरलेला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णांची नोंद रत्नागिरी आणि चिपळूण या दोन तालुक्यात आहे. दुसर्‍या लाटेतही तीच परिस्थिती असून दोन्ही तालुक्यात रुग्ण संख्येबाबत स्पर्धाच आहे. मार्च अखेरीस रुग्ण वाढीला सुरवात झाली. शिमगोत्सवासह विवाह सोहळे मोठ्याप्रमाणात होत होते. परिणामी लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढल्याने कोरोना वाढीला चालना मिळाली आहे. मागील वर्षी एप्रिल 2020 ते 17 एप्रिल 2021 पर्यंत तालुक्यात 4 हजार 248 रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यातील बरे झालेल्यांची संख्या  3 हजार 277 असून 971 रुग्ण उपचाराखाली आहे. पंधरा दिवसांपुर्वी तालुक्यातील 42 गावे कोरोनामुक्त होती. पहिल्या लाटेवेळी रत्नागिरी शहर परिसरात रुग्णांची संख्या अधिक होती; मात्र सध्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. रुग्णांबरोबर मृत्यूचा आकडाही अधिक असून आतापर्यंत 108 जणांची नोंद झाली आहे. रुग्णावर उपचारासाठी तिन कोविड सेंटर आहेत. त्यात सामाजिक न्याय भवन, आयटीआय आणि बीएड कॉलेजचा समावेश आहे. गंभीर आजारी असलेले रुग्ण महिला रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात येत आहेत. रुग्ण वाढत असल्याने गोगटे जोगळेकर महाविद्यालयांचे मुलींचे होस्टेलही घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.