लॉकडाऊनमुळे एसटीच्या बहुतांश फेऱ्या रद्द; उत्पन्नावर मोठा परिणाम

रत्नागिरी:- कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शासनाने दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन घोषित केला. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. प्रवाशांअभावी रत्नागिरी विभागाच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. रविवारी दिवसभरात अवघ्या ६५ फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. मात्र दैनंदिन उत्पन्नाच्या तुलनेत ७५ लाख ९३ हजार ५६९ रूपयांचा तोटा विभागाला सोसावा लागत आहे. सोमवारी देखील हीच परिस्थिती होती. प्रवाशांअभावी एसटीच्या बहुतांश फेऱ्या रद्द करण्यात आल्या. 

लॉकडाऊननंतर एसटीची गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली असतानाच पुन्हा लाॅकडाऊनचा सामना करावा लागला आहे. मात्र, एस.टी.ला लॉकडाऊनमधून वगळण्यात आले असले तरी प्रवासी नसल्यामुळे ऊत्पन्नावर परिणाम होत आहे.रत्नागिरी विभागात ६०० गाड्यांद्वारे दैनंदिन ४२०० फेऱ्या सोडण्यात येतात. एक लाख ८० हजार किलोमीटर प्रवासातून एस.टी.ला ५० लाखांचे उत्पन्न मिळते. जेमतेम डिझेल खर्च भागत असला तरी स्पेअर पार्टस् व अन्य खर्चासाठी महामंडळाकडून आर्थिक मदत घ्यावी लागत आहे. वीकेंडमुळे शनिवारी दिवसभरात अवघ्या १६० फेऱ्या संपूर्ण विभागातून सोडण्यात आल्या होत्या. १९ हजार ५०१ किलोमीटर इतकाच प्रवास झाला. दोन दिवसात २४ लाख ६४३१ रूपयांचे उत्पन्न लाभले आहे. मात्र दैनंदिन उत्पन्नाच्या तुलनेत ७५ लाख ९३ हजार ५६९ रूपयांचा तोटा विभागाला सोसावा लागत आहे.एस.टी.ला पूर्ण क्षमतेने वाहतुकीला परवानगी दिली असली तरी प्रवासी स्वत:च घराबाहेर पडणे टाळू लागले असल्याने प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे. रविवारी मात्र ६५ फेर्‍या दिवसभरात सोडण्यात आल्या. त्यामुळे १३ हजार ७०० किलोमीटर इतका प्रवास झाला आहे. दोन दिवसांत फेऱ्यांवर परिणाम झाल्याने एसटीच्या उत्पन्नात घट झाली आहे.