रनपचे अद्ययावत कोव्हीड सेंटर दोन दिवसात सुरू होणार

नगराध्यक्ष बंड्या साळवी; आरोग्य मंदिर येथील नगर परिषद दवाखान्यात प्रस्तावित

रत्नागिरी:- वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत रत्नागिरी नगरपालिकेने आपली यंत्रणा सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरात रनपने अद्ययावत कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील आरोग्य मंदिर येथील नगर परिषद दवाखान्यात सुसज्ज असे कोव्हिड सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी सांगितले. 

 राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्यात याबाबत दूरध्वनीवर चर्चा झाल्यावर तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिली आहे. भविष्यात 5000 पर्यंत रुग्णसंख्या जाऊन पोहचेल अशी भीती जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली होती. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखत हा निर्णय घेण्यात आला आहे. नगरपालिकेच्या आरोग्य मंदिर येथील हॉस्पिटल च्या इमारतीत हे अद्ययावत कोव्हीड सेंटर उभारण्यात येणार आहे.