धोका वाढला; जिल्ह्यात 24 तासात तब्बल 337 पॉझिटिव्ह रुग्ण

5 रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू

रत्नागिरी:-मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा विस्फोट झाल्याचे चित्र आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण मागील 24 तासात सापडले आहेत. आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 337 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 337 पैकी 237 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 100 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत.

मागील तीन दिवसात जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येचा स्फोटच झाला. आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. 24 तासात 337 नव्या रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 13 हजार 297 वर जाऊन पोहचली आहे. मंगळवारी आलेल्या अहवालात 227 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 100 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज 895 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर आतापर्यंत एकूण 108391 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

चोवीस तासात 111 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 11 हजार 233 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 84.47 टक्के आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने 5 रुग्णाचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 408 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 3.06 % आहे.

जिल्ह्यातील आज सापडलेल्या 337 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 142, दापोली 41, खेड 40, गुहागर 9, चिपळूण 57, संगमेश्वर 25, राजापूर 5 आणि लांजा तालुक्यात 18 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 10.92% आहे.