जिल्ह्यात 91 पैकी 3 केंद्रांवरच कोरोना लसीकरण

रत्नागिरी:- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच जिल्ह्यात सुरू केलेल्या 91 केंद्रांपैकी आता केवळ 3 केंद्रांवरच कोरोना लसीकरण सुरू आहे. त्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय, कळंबणी व केळशी या केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी केवळ 800 लसीचे डोस शिल्लक आहेत.

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिम वेगाने राबविण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला होता. जिल्हा परिषद आरोग्य उपकेंद्रांमध्ये लसीकरण करण्यासाठी तेथील कर्मचार्‍यांना प्रशिक्षणही देण्यात आले होते; मात्र गेल्या पंधरा दिवसात पुरेशी लसच उपलब्ध न झाल्यामुळे केंद्र वाढविण्याऐवजी कमी करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत राबविलेल्या लसीकरण मोहीमेला चांगला प्रतिसाद प्रतिसाद लाभला होता. जिल्ह्यातील 97 हजार लोकांनी कोविशिल्ड आणि को व्हॅक्सीनची लस घेतली होती. जिल्ह्यातील कोव्हिशील्ड लसीचा साठा संपूष्टात आला असून दुसरा डोस देण्यासाठीही मात्रा शिल्लक नसल्याची माहिती पुढे आली आहे. कोव्हॅक्सिनचा काही साठा उपलब्ध आहे; मात्र 28 दिवसांनी दुसरा डोस द्यावयाचा असल्याने नवीन व्यक्तींसाठी त्याचा वापर केला जात नाही. दुसर्‍या डोससाठी ती मात्रा ठेवण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागामार्फत राज्य शासनाकडे 1 लाख 70 हजार डोसची मागणी करण्यात आली आहे. ती वेळेत न मिळाल्यास लसीकरण मोहीम ठप्प होण्याची शक्यता आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात 91 केंद्रे सुरू करण्यात आली होती. लस उपलब्ध न झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालय, कळंबणी (खेड), केळशी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणीच लसीकरण सुरु आहे.