जिल्ह्यात 10 हजार जण कोरोनामुक्त तरीदेखील जिल्हा रुग्णालयात प्लाज्माचा तुटवडा 

रत्नागिरीः– कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच गंभीर रुग्णांना प्लाज्मा थेरपी लाभदायक ठरु शकते. जिल्ह्यात महिन्याला ६० बॅगची आवश्यकता आहे. परंतु कोरोनामुक्त झालेले रुग्ण रक्तदानासाठी पुढे येत नसल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार रुग्ण बरे झाले आहेत. परंतु यांनी रक्तदानाकडे पाठ फिरविल्याने नव्या रुग्णांसाठी प्लाज्मा थेरपीचा अवलंब करणे अशक्य झाले आहे.

फूड अण्ड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशननुसार अनेक वर्षांपासून या थेरपीचा उपयोग केला जातो. याआधीही अनेक रोगांच्या निपटाऱ्यासाठी या थेरपीचा वापर झाला आहे. त्याचा प्रभाव दिसण्यासाठी रुग्णाची चिकित्सा गरजेची आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाल्यावर प्लाज्मा थेरपी होते. या प्रक्रियेचा दात्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. मशिनद्वारे ही प्रक्रिया केली जाते. दात्याकडून रक्त काढले जाते. या मशिनमध्ये रक्त फिल्टर होते. लाल, पांढऱ्या, पिवळया पेशी पुन्हा शरीरात जातात. यावेळी केवळ प्लाज्मा वेगळा होतो व तो घेतला जातो. शरीरात पाच ते सहा लिटर प्लाज्मा असतो. एका रुग्णाकडून साधारण ५०० मिली प्लाज्मा घेतला जातो आणि तो कोरोना बाधिताला दिला जातो. ही सर्व प्रक्रिया मशिनद्वारेच होते .कोरोनातून बरे झालेल्या १८ ते ६० वयातील व्यक्ती रक्तदान करु शकतो. ५० किलोपेक्षा जास्त वजन असावे.  एकपेक्षा जास्त प्रसूती झालेल्या महिलेला प्लाज्मा दान करण्याची परवानगी दिली जात नाही. ऑक्सिजनची मात्रा ज्यांची कमी होते, धाप जास्त लागते त्यांना प्लाज्मा दिल्यास उपयोगी ठरते. थेरपीनंतर तिसऱ्या दिवशी कोरोना व्हायरस मरू शकतो. असे असताना जिल्ह्यात प्लाज्मा दान करण्यासाठी दाते पुढे येत नसल्याने ज्या रुग्णांना प्लाज्मा आवश्यक आहे. त्यांना प्लाज्मा द्यायचा कसा असा प्रश्न आरोग्य यंत्रणे समोर उभा राहिला आहे.