प्रकल्पासाठी स्थानिकांचा पुढाकार
राजापूर :- रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन वाढत चालले असताना तो तालुक्याबाहेर नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशा स्थितीमध्ये हा प्रकल्प तालुक्यामध्ये व्हावा, यासाठी ग्रामपंचायतींकडून पुढाकार घेतला जात आहे. आयलॉग जेटीसाठी प्रस्तावित सुमारे दीड हजार एकर आणि परिसरातील जागा घेऊन त्या ठिकाणी रिफायनरीची उभारणी करावी अशी मागणी तालुक्यातील नाटे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याबाबतचा ठराव नुकताच नाटे ग्रामपंचायतीमध्ये संमत करण्यात आला.
तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून गेल्या दोन-तीन वर्षापासून विविध मतप्रवाह निर्माण झाले आहेत. रिफायनरी प्रकल्पविरोधी असलेली धार आता हळूहळू कमी होऊ लागली असून प्रकल्प समर्थन वाढू लागले आहे. भूसंपादन रद्दचा अध्यादेश देणाऱ्या राज्य शासनाकडून मात्र रिफायनरीबाबत कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट केली जात नाही.
रिफायनरी प्रकल्प तालुक्यातून अन्य ठिकाणी हलविण्याच्या जोरदार हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू झाल्या आहेत. त्याचवेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्प राज्याच्या हिताचा असून तो राज्याबाहेर जाणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. एका बाजूला रिफायनरी प्रकल्पावरून वरिष्ठ पातळीवर वेगाने घडामोडी होत असताना हा प्रकल्प तालुक्यामध्ये व्हावा, यासाठी नाटे ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे.
नाटे परिसरामध्ये आयलॉग जेटी प्रकल्प प्रस्तावित असून या प्रकल्पासाठी सुमारे दीड हजार एकर जागा उपलब्ध आहे. या जागेसह आजुबाजूच्या जागा संपादित करून त्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करावी, त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य देण्याचे ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसा ठराव पारीत केल्याचे पत्र नाटे ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठविले आहे.