झाडगांव केंद्रात दोन सत्रात कोरोना लसीकरण होणार 

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील झाडगांव केंद्रात दोन सत्रात होणार्‍या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी केले आहे.

रत्नागिरी जिल्हयात कोविडचे रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी प्रभावी कोविड लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कोविड लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत. त्यात रत्नागिरी शहरातील नागरी आरोग्य केंद्र झाडगांव येथे दोन सत्रात कोविड लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत.

जिल्ह्यात लसीकरण सत्रे ग्रामीण व शहरी भागात सुरु करण्यात आली आहेत. झाडगाव या नागरी आरोग्य केंद्रात आजपर्यंत 3,115 लाभार्थ्यांनी कोविड लसीकरणाचा लाभ घेतला आहे. ही लस 45 वयोगटावरील सर्व व्यक्तींना देण्यात येत असून, कोमॉर्बिडीटी असलेल्या व्यक्तींना देखील त्याचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यात लसीचा 65 हजार 842 लोकांनी लाभ घेतला आहे. कोविड लस ही डाव्या हाताच्या दंडावर घेतली जाते. कोविड लसीचे दोन डोस पूर्ण करणे आवश्यक आहे. कोविड लस घेतल्यानंतर मळमळ होणे, थोडा ताप येणे ही संभाव्य लक्षणे काही लोकांमध्ये दिसून येतात. लस घेतल्यामुळे आजाराची तिव्रता कमी होते आणि मृत्यूचा धोका टळतो. त्यामुळे कोविड आजाराची तिव्रता कमी करण्याचा एक प्रभावी उपाय आहे. ही लस घेतली म्हणजे कोविड आजारापासून आपण सामान्य माणसाप्रमाणे 100 टक्के सुरक्षित झालो असे नाही. यामध्ये दोन व्यक्तींमधील अंतर 1 मीटर पेक्षा जास्त ठेवणे, मास्क वापरणे व वारंवार हात धुणे या बाबींचा अवलंब करणे आवश्यक आहे.