जि. प. च्या 87 आरोग्य उपकेंद्रात मिळणार कोरोनाची लस 

रत्नागिरी:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या 87 आरोग्य उपकेंद्रात लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या 78 ठिकाणी केंद्र सुरु आहेत. केंद्रात वाढ केली जाणार असली तरीही पुढील चार दिवस पुरेल एवढीच लस शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे.

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही प्रकारच्या कोरोनावरील लसी रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. कोल्हापूर येथून लसीचा साठा जिल्ह्याला पुरवला जातो. दहा दिवसांपुर्वी काही डोस उपलब्ध झाले होते. शासनाने 45 वर्षांपर्यंतच्या लोकांसाठी कोरोना लसीकरणाला सुरवात केल्यामुळे प्रतिसाद वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 60 हजाराहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. त्यातील पहिला डोस घेणार्‍यांची संख्या 49 हजार 346 असून दुसरा डोस 10 हजार 723 जणांनी घेतला. यामध्ये 17 हजारहून अधिक लोक हे ज्येष्ठ नागरिक आहेत. मुंबई शहराशी निगडीत असल्यामुळे कोरोना रुग्ण वाढीचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यावर होत आहे. जास्तीत जास्त लोकांना लस देण्यासाठी गावागावात केंद्र सुरु करण्याचा निर्णय जि. प. आरोग्य विभागाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचा समावेश होता. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि काही खासगी रुग्णालयात सुविधा दिली गेली. तिसर्‍या टप्प्यात गावपातळीवर कोरोना लसीकरणाची सुविधा देण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग सुरु केले आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने 87 उपकेंद्रांची निवड केली आहे. तेथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांना नुकतेच प्रशिक्षणही दिले गेले आहे.