रत्नागिरी तालुक्यातदेखील वाढली रुग्णसंख्या; 24 तासात सापडले नव्याने 18 रुग्ण

रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आता रत्नागिरी तालुक्यात देखील कोरोना बाधितांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. मागील 24 तासात तालुक्यात आरटीपीसीआर चाचणी केलेले 15 तर अँटिजेन चाचणी केलेल्या 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येला थोपवण्यासाठी लोकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी असे आवाहन आरोग्य यंत्रणे मार्फत करण्यात आले आहे.
 

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागल्याचे चित्र आहे. तालुक्यात देखील हीच परिस्थिती आहे. कोरोना रुग्णसंख्येला थोपवण्यासाठी रात्रीची जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय शिमगोत्सवावर देखील नियम लागू करण्यात आले आहेत.
 

रत्नागिरी तालुक्यात 24 तासात 18 बाधित रुग्ण सापडले आहेत. यात जांभारी, उत्कर्ष नगर, एम के टॉवर, उद्यमनगर, माळनाका, तेली आळी, कोळंबे, पॉवर हाऊस, शांती नगर, शिवाजी नगर, साळवी स्टॉप, पावस, साखरपा, वांद्री, रॉयल सिटी पार्क, पेटकरवाडी जांभारी आणि ग्रामीण पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.