बापरे; जिल्ह्यात 24 तासात 116 कोरोना बाधित रुग्ण 

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना दिवसेंदिवस फोफावू लागला आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 116 नवे रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नव्याने आढळलेल्या 116 रुग्णांपैकी 82 जण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 34 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील तब्बल 43 रुग्णांचा समावेश आहे.

शनिवारी सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा चिंताजनक असून जिल्ह्यात 116 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10,733 वर जाऊन पोहचली आहे. मागील चोवीस तासात 693 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत 97 हजार 257 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 40 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 9 हजार 951 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 92.71 टक्के आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने चिपळूण तालुक्यातील 32 वर्षीय रुग्णाचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 372  इतकी आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर 3.46% इतका आहे.

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. शिमगोत्सवाच्या तोंडावर कोरोनाचा जिल्हाभर होणारा प्रसार आरोग्य यंत्रणेवर ताण आणणारा आहे. नव्याने सापडलेल्या 116 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील सर्वाधिक 43, दापोली 8, खेड 7, चिपळूण 28, गुहागर 13, मंडणगड 5, राजापूर 4, लांजा 1 आणि संगमेश्वर तालुक्यात 7 रुग्णांचा समावेश आहे.