मारुती मंदिर गाळेधारकांच्या याचिकेवर 26 मार्च रोजी निर्णय

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषदेच्या मालकीचे छत्रपती शिवाजी स्टेडियमधील गाळे ताब्यात घेण्यासंदर्भातील न्यायालयाचा निकाल 26 मार्च रोजी येणार आहे. रनपने हे गाळे ताब्यात घेण्यासाठी गाळेधारकांना नोटीस दिली. नोटीस मिळाल्यापासून गाळे ताब्यात देण्याची समज देण्यात आली होती. या नोटीसच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळावी यासाठी गाळेधारकांनी सहदिवाणी न्यायालयात अर्ज केला होता. 

छत्रपती शिवाजी स्टेडियमधील 11 गाळ्यांचा ताबा घेण्यासाठी रनपने 9 मार्च रोजी नोटीस देवून गाळे ताब्यात देण्याची समज दिली. ही नोटीस विनाअधिकार आणि बेकायदेशीरपणे बजावण्यात आल्याचे सांगत ही नोटीस रद्द करण्यासाठी आणि  शासनाचा निर्णय येईपर्यंत गाळे ताब्यात घेण्याबाबतची कोणतीही कारवाई होवू नये. गाळेधारकांना गाळेवापरासंबंधी कोणतीही हरकत, अडथळा करु नये,अशी ताकीद देण्याची विनंती गाळेधारकांनी अर्जाद्वारे न्यायालयाला केली. दोन्ही बाजु ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने 20मार्च रोजी निर्णय देण्याची तारीख निश्चित केली होती. मात्र या तारखेला 26 मार्च रोजी निर्णय देण्याची तारीख न्यायालयाने निश्चित केली आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या मालकीच्या 11 गाळ्यांची मुदत संपल्यानंतर ते ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु झाली. तेव्हापासून  गाळेधारक न्यायालयीन लढा देत आहेत. सहदिवाणी न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयपर्यंत लढा देवूनही गाळेधारकांना दिलासा मिळाला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने रत्नागिरी नगरपरिषदेची गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया योग्य ठरवून नवीन गाळेधारकांना लिलावाने मिळालेले गाळे तीन महिन्यानंतर ताब्यात देण्यास सांगितले. नव्याने लिलावाने गाळे देताना प्रत्येक गाळ्याचे अधिमुल्य आणि मासिक भाडे योग्य ठरवून लिलाव प्रक्रिया करण्यास हिरवा कंदील दिला. त्यानुसार प्रक्रिया पार पडली होती.