कोर्टाच्या निकालाआधीच 11 गाळेधारकांकडून गाळे रिकामे 

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर येथील त्या अकरा गाळेधारकांनी गाळे रिकामे करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने काढलेल्या नोटिसीविरोधात ते न्यायालयात गेले होते. मात्र पालिकेची कारवाई थोपविण्यासाठी ठोस कागदपत्र किंवा पुरावे नसल्याने स्वतःहून गाळेधारक गाळे रिकामे करीत असल्याचे समजते. मात्र पालिकेने ते अजून ताब्यात घेतलेले नाहीत.

पालिकेच्या मालकीचे छत्रपती शिवाजी क्रीडांगण येथील 11 गाळ्यांची मुदत संपल्याने ते ताब्यात घेण्यावरून विषय अनेक दिवसांपासून सुरू आहे.  पालिकेने गाळे ताब्यात घेण्याच्या हालचाल सुरू केल्या. गाळेधारकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली तसेच नगरविकास मंत्रालयाकडे मुदतवाढीसाठी याचना केली. उच्च न्यायालयाने 4 आठवड्यात निर्णय घेऊन दोन महिन्यात प्रक्रिया पूर्ण करण्यास पालिकेला सांगितले. पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली. ती स्थगित करण्यासाठी रत्नागिरी येथील दिवाणी न्यायालयात अर्ज केला. दिवाणी न्यायालयाने निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे पालिकेने गाळे ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला.

पालिकेच्या मालमत्ता विभागाचे अधिकारी काही दिवसांपूर्वी गाळे ताब्यात घेण्यासाठी गेले होते. आम्हाला आधी नोटीस का दिली नाही, ताब्यात घेण्याबाबत न्यायालयाचा आदेश आहे का? नगरविकास खात्याकडे झालेल्या बैठकीबाबत आम्हाला अभिप्राय आलेला नाही, असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले. त्यात वेळेत पोलिस संरक्षण न मिळाल्याने पालिकेच्या कर्मचार्‍यांना हात हालवत परत यावे लागले. यावरून कारवाई करण्यास प्रशासन चालढकल करीत आहे, असा आरोप नगराध्यक्ष साळवी यांनी केला. मुख्याधिकार्‍यांनीही आम्ही टाळाटाळ करीत नाही असे उत्तर दिले. गाळेधारकांना नोटिस बजावून गाळे रिकामे करण्यासाठी तीन दिवस देण्यात आले. त्याविरोधाक गाळेधारक न्यायालयात गेले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पालिका कारवाई करत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांना पर्याय उरला नाही. सर्व गाळेधारकांनी आज आपणहुन गाळे रिकामे करण्यास सुरवात केली.