रत्नागिरी जिल्हा राज्यात दुसर्‍या क्रमांकावर

महाकृषी ऊर्जा अभियान; 11 हजार शेतकर्‍यांनी भरले 87 लाख

रत्नागिरी:-नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणाला राज्यातील शेतकरी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत राज्यातील 5.82 लाख शेतकर्‍यांनी थकीत कृषीपंपांच्या वीज बिलापोटी 511 कोटी 26 लाख रुपयांचा भरणा केला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांनी 45 लाख थकबाकी आणि चालु बिलापोटी 42 लाख असे 87 लाख रुपये भरणा केला. त्यामुळे ग्रामीण भागात कृषीपंप वीज बील भरण्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात दुसर्‍या क्रमांकावर मजल मारली आहे. 

कृषी ग्राहकांना सवलतीसह वीजबिल वसुलीसाठी महावितरणमार्फत ’महाकृषी ऊर्जा अभियान’ राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत भरणा करण्यात आलेल्या 511 कोटी  26 लाख रकमेवर 256 कोटी रुपयांची सूट देण्यात आली. यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील  10 हजार 857  शेतकर्‍यांनी ही थकबाकी भरली आहे. थकीत वीज बिलापोटी 45 लाख आणि चालू बिलाचे 42 लाख असे एकुण 87 लाख रुपये शेतकर्‍यांनी भरणा केला. ग्रामीण भागात सध्या रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात दुसर्‍या क्रमांकावर आहे. राज्यातील 44 लाख 44 हजार कृषिपंप ग्राहकांकडे 45 हजार 785 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या नवीन योजनेमुळे एकूण 30 हजार कोटी रुपयांची सूट देण्यात येणार आहे.तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांचे सप्टेंबर 2015 पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे.