भाट्ये येथे वृद्धाच्या मृतदेहाचा सांगाडा सापडल्याने एकच खळबळ 

रत्नागिरी:- सुमारे महिनाभर बेपत्ता असलेल्या वृद्धाचा सडलेला मृतदेह शहारानजीकच्या भाट्ये येथील पडक्या इमारतीत आढळला आहे. शहर पोलीसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन तो जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

भाट्ये येथील प्रदिप पांडूरंग हरमले हे एक महिन्यापासून बेपत्ता होते. ते नेहमी घरी येत नव्हते. गंवडी काम करुन ते तेथेच वास्तव्य करीत होते. मात्र आठ दिवसांतून एकदा घरी येत होते. गेले महिनाभर ते बेपत्ता असल्याने नातेवाईकांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार शहर पोलीस स्थानकात देण्यात आली होती.

रविवारी दुपारी काही ग्रामस्थ या भागात गेले असता त्यांना दुर्गंधी येऊ लागली. त्यांनी त्या पडक्या इमारतीत जावून पाहिले असता तेथे सडलेला मृतदेह आढळला. त्यांनी याची माहिती शहर पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. मृतदेहाच्या सोबत असलेल्या पिशवीत आधार कार्ड, रेशन कार्ड आढळल्याने प्रदिप हरमले यांची ओळख तात्काळ पटली आहे. या प्रकरणी शहर पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.