पाणी योजनेचे काम होईपर्यंत सिग्नल यंत्रणा बंद ठेवा

राष्ट्रवादीचे वाहतूक पोलीस, रनपला निवेदन

रत्नागिरी:- शहरातील जेलरोड चौकातील रस्त्यांवर पालिकेने पाणी योजनेसाठी खोदकाम केले आहे. तेथे रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीचे सिग्नल स्थगित करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाहतूक पोलिस निरीक्षक आणि नगरपालिकेकडे केली आहे.

रत्नागिरी शहरातील नवीन पाणीयोजनेचे काम वेगाने सुरू आहे. शहरातील सर्वच भागात नव्या पाइपलाइन टाकल्या जात असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदाई सुरू आहे. खोदलेले रस्ते पूर्वीप्रमाणे समपातळीत केले जात नसल्याने त्याची वाहतुकीला अडचण होत आहे. याबाबत नागरिकांकडून वारंवार पालिकेला कळविण्यात येत आहे. तक्रारीनंतर त्यावर मलमपट्टी केली जाते; मात्र तोपर्यंत पालिका प्रशासन बघ्याची भूमिका घेत राहते. हीच परिस्थिती जिल्हा परिषद ते जेल रोड या भागात निर्माण झाली आहे. याच ठिकाणी सिग्नल यंत्रणा असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. सकाळी 10 ते 11.30 आणि सायंकाळी साडेचारनंतर या ठिकाणी चालकांना कसरत करत वाहने हाकावी लागतात. खोदाई केलेला भाग जवळपास अर्ध्या रस्त्यात असल्यामुळे ही गैरसोय होत आहे. यामध्ये दुचाकींना अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच एखादी रुग्णवाहिका रहदारीमध्ये अडकून राहू शकते. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत सिग्नल स्थगित करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.