वीज बिल सहा टप्प्यात भरण्याची ग्राहकांना संधी 

मनसेच्या आंदोलनानंतर महावितरणचा निर्णय 

रत्नागिरी:-कोरोना कालावधीत आलेल्या भरमसाठ विज बिलांच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने घेतलेल्या कठोर भुमिकेविरोधात रत्नागिरीत मनसेने सोमवारी (ता. 15) हल्लाबोल आंदोलन केले. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अखेर महावितरणच्या अधिकार्‍यांनी सहा टप्प्यात बिल भरण्यासाठी ग्राहकांना संधी दिली जाणार असल्याचे आश्‍वासन दिल्यामुळे मनसेने आंदोलन स्थगित केले.

कोरोना कालावधीत महावितरणकडून विजेची भरमसाठ बिल काढण्यात आली होती. सरसकट बिलांमध्ये अनेक वाढीच चार्जेस लावण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. बिले माफ करा किंवा कमी करा असा पवित्रा घेत मनसेने गेले चार महिने महावितरणविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यानंतरही गेल्या महिन्याभरात थकित विजबिलांच्या वसुलीसाठी महावितरणची पथके सरसावली. रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो ग्राहकांचा वीजपुरवठाही कट करण्यात आला. यामध्ये काही सर्वसामान्यांना फटका बसला आहे. महावितरणच्या कारवाईविरोधात मनसेने हल्लाबोल आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार रत्नागिरीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष जितू चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत, श्रीनाथ यांच्यासह मनसैनिकांनी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास महावितरणच्या विभागिय कार्यालयापुढे धाव घेतली. विज तोडणीच्या कारवाईचा निषेध करतानाच कारवाई थांबविण्याचे आवाहन केले. यामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस उपअधिक्षक सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक सुनिल लाड यांच्यासह पोलिसांचा बंदोबस्त होता. पोलिस अधिकार्‍यांनी चर्चा केल्यानंतर महावितरणचे अधिकारी डी. टी. सायनेकर घटनास्थळी दाखल झाले. मनसे पदाधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर विज तोडणीची कारवाई थांबवण्याचे आश्‍वासन दिले. तसेच बिले भरण्यासाठी सहा इन्स्टॉलमेंट देण्यात येणार आहे. विजबिलांच्या वाढीव चार्ज बाबत असलेल्या शंकाची पुर्नपडताळी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.