सिगरेटची तलफ बेतली जीवावर

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे येथे दुचाकीतील पेट्रोल काढताना सिगरेट पेटवण्यासाठी लायटर पेटवला. तेव्हा पेट्रोलने पेट घेतल्याने त्यात भाजून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 8.50 वा.सुमारास घडली.

वसीम सल्लाउद्दीन पठाण (32,रा.शेट्येनगर, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत त्याची पत्नी अस्फिया वसीम पठाण (30,रा.शेट्येनगर, रत्नागिरी) हिने ग्रामीण पोलिसांकडे खबर दिली.त्यानुसार,शुक्रवारी वसीम आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच- 08-एन 0204) घेउन कोतवडे येथे सासुरवाडीला गेला होता.तिथे दुचाकीतील पेट्रोल प्लॅस्टिकच्या बाटलीत काढत असताना त्याला सिगरेट ओढण्याची लहर आली. म्हणून त्याने लायटर पेटवला असता अचानकपणे पेट्रोलने पेट घेतल्याने त्यात वसिम भाजून गंभिर जखमी झाला.त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतू, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल इंदुलकर अधिक तपास करत आहेत.