वीस मानकर्‍यांच्या उपस्थितीत पालखी घरोघरी नेण्यास परवानगी

रत्नागिरी:- कोरोनाचे सावट असल्यामुळे कोकणातील शिमगोत्सवावर निर्बंध घालण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने घरोघरी पालख्या नेण्यावर बंधन घातल्यामुळे संभ्रमाचे वातावरण होते; मात्र वीस मानकर्‍यांच्या उपस्थितीत पालखी घरोघरी नेता येईल अशी परवानगी देण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे गावकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

शनिवारी (ता. 14) सायंकाळी प्रांताधिकारी डॉ. विकास सुर्यंवशी यांच्यासह प्रशासनातील अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मंत्री सामंत यांची बैठक झाली. यावेळी गावागावात निर्माण झालेल्या संभ्रमाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शिमगोत्सवाबाबत निर्बंध लागू केले. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने घरोघरी घेऊन नेण्यात येणार्‍या पालख्या या मंदिराबाहेर नेण्याबाबत संभ्रम होता. जिल्हाधिकार्‍यांनी घातलेल्या निर्बंधांमध्ये सुधारणा करण्याची सूचना मंत्री सामंत यांनी केली आहे.

यावर्षी पारंपारिक पद्धतीने शिमगोत्सव साजरा केला जाईल. घरोघरी तसेच सहाणेवर पालखी जाईल; परंतु त्यासाठी पालखीसोबत 20 मानकर्‍यांची मर्यादा घालण्यात आली आहे. इतर पारंपारिक नमन, खेळे पन्नास ग्राममस्थांच्या उपस्थित करण्यात येणार आहेत. हे सर्व करताना मंदिर व्यवस्थापकांना स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगीशिवाय कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जावे अशा सूचना मंत्री सामंत यांनी केल्या आहेत.

गतवर्षी शिमगोत्सव सुरू असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अर्ध्यावरुन पालख्या पुन्हा मंदिरात गेल्या होत्या. यावर्षी काही प्रमाणात कोरोनाचे सावट आहे. नियमांचे पालन करुन पालख्या बाहेर काढण्याला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थांसह मानकर्‍यांची जबाबदारी वाढली आहे. ग्रामस्थांची गर्दी टाळण्यासाठी त्यांनी नियोजन करणे आवश्यक आहे.