बँक कर्मचाऱ्यांचा उद्यापासून दोन दिवसाचा संप

खासगीकरणाच्या धोरणाविरोधात जिल्ह्यात बंद; व्यवहार होणार ठप्प

रत्नागिरी:- बँकांच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात संघटनांनी सोमवारपासून दोन दिवसाचा संप पुकारला आहे. त्याची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात होणार असून सर्व अधिकारी, कर्मचारी यात सहभागी होणार आहेत. सोमवारी आणि मंगळवारी बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.

देशभरातील सुमारे 10 लाख आणि महाराष्ट्रातील 50 हजार बँक कर्मचारी व अधिकारी सोमवारी (ता. 15) आणि मंगळवारी (ता. 16) देशव्यापी संपात सहभागी होत आहेत. हा संप देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या करण्यात येणार्‍या खाजगीकरणाविरोधात आहे. सरकारने अर्थसंकल्पात आयडीबीआय व दोन सरकारी बँकांचे खाजगीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली. सुमारे 90 लाख कोटी रुपयांची जनतेची बचत मोठ्या उद्योगांच्या हाती सूपूर्द होणार आहे. ज्या उद्योगांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना लाखो कोटी रुपयांना थकीत कर्जाच्या रुपात गंडविले आहेत. जी बँकांना अंतिमतः राईट ऑफ म्हणजेच माफ करावी लागली. सरकारने कठोर पावले उचलून थकीत कर्जे वसूलीसाठी बँकांना मदत केली असती तर एकाही सार्वजनिक बँकेला सरकारकडून भांडवलाच्या रुपाने अर्थसंकल्पात तरतूद करुन एक पैशाचीही मदत लागली नसती. दिवाळखोरी कायद्यामुळे थकीत कर्जाची पटकन वसुली होईल असा सरकारचा दावा आहे. सरकारच्या धोरणाला तीव्र आक्षेप घेत बँकींग उद्योगातील नऊच्या नऊ संघटना व दहा लाख बँक कर्मचारी व अधिकारी दोन दिवसांच्या संपावर जात आहेत. यामध्ये सर्व राष्ट्रीयीकृत बँका, जुन्या खाजगी बँका, विदेशी बँका व ग्रामीण बँका यांचा समावेश आहे. संपाच्या दिवशी रत्नागिरीत करोनाच्या निबर्ंधामुळे निदर्शने करणे शक्य नाही. जनसामान्यांच्या बचतीच्या सुरक्षिततेसाठी, देशातील बँकींग उद्योग वाचविण्यासाठी बँक कर्मचारी व अधिकारी 15 व 16 मार्च रोजी दोन दिवस संप करणार असल्याचे रत्नागिरी बँक कर्मचारी समन्वय समितीचे सचिव राजेंद्र गडवी यांनी परिपत्रकाद्वारे सांगितले.