पाली पाथरट, साठरेत कलिंगडावर वेलमर आजाराचा प्रादुर्भाव

 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली पाथरट, साठरेबांबरमधील शेतक-यांनी आपल्या शेतामध्ये रब्बी हंगामामध्ये कलिंगड पिकाची लागवड केली असून गेल्या काही दिवसात या विभागामध्ये झालेल्या हवामान बदल व अवकाळी पाऊसाचा परिणाम होऊन मात्र कलिंगडाच्या वेलांवर बुरशीजन्य, वेलमर रोगाची लागण झालेली आहे. आता एैन फळधारणेच्या वेळीच त्याचा उत्पादनाला फटका बसून फळांचा दर्जा कमी होऊन वजन कमी होत असून एकूणच फळधारणेवर ६० ते ७० टक्के परिणाम होऊन तेवढी उत्पादन घट होणार असल्याने त्यामुळे शेतक-यांना त्याचा फटका बसून आर्थिक नुकसानी होणार आहे.
           

यासंदर्भात माहिती देताना साठरेबांबर येथील प्रगतशील शेतकरी व ग्रा.पं.सदस्य विजय बारगुडे यांनी सांगितले की, पाली विभागातील पाली-पाथरट, साठरे बांबर येथील काही शेतक-यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या रब्बी हंगामासाठी कलिंगडाची संकरित बियाणे आणून लागवड शेती केली होती त्यातून आता काही दिवसांपासून फळधारणा होऊन फळांची विक्रीही सुरुवात झाली होती. त्याच दरम्यान या विभागामध्ये यंदा अचानकपणे फेब्रुवारी अखेरीस सातत्याने तीन ते चार दिवस झालेला अवकाळी पाऊस, त्यानंतर येणारे मळभ व पहाटेचे धुके, उष्मा याचा परिणाम होऊन कलिंगडाचा वेल बुध्यांमध्येच सुकायला सुरुवात होऊन वेल मरत आहे. त्यामुळे हा बुरशीजन्य आजार आहे की बियाण्यांची सदोषता असल्याने झाडांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने वेलमराचा प्रार्दुभाव झाला आहे का? याची नेमकी स्पष्टता नसल्याने शेतक-यांमध्ये झालेल्या नुकसानीमुळे संभ्रमावस्थेत आहेत.
            

हा वेलमर प्रार्दुभाव पाली-पाथरटमधील शंकर धाडवे यांच्या १ एकर तसेच साठरे बांबरमधील विजय बारगुडे,  निलेश ठोंबरे व संदीप ठोंबरे २ एकर , सुशिल शिंदे २० गुंठे, प्रकाश बावकर १ एकर या शेतक-यांच्या प्रक्षेत्रावर लागवड केलेल्या ठिकाणी प्रार्दुभाव झालेला आहे. त्यामुळे सध्या उत्पादन सुरु झालेल्या कलिंगडच्या फळांचे आकारमानही अत्यंत कमी असून त्यांचा दर्जाही तितकासा चांगला नाही आहे. त्यातच यंदाच्या वर्षी कलिंगडाला चांगला बाजारभाव आहे मात्र उत्पादनात ६० ते ७० घट झाल्याने १३ ते १४ टनांऐवजी फक्त ३ ते ४ टन उत्पादन होणार असल्याने शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे याची कृषि विभागाने दखल घेऊन या वेलमर आजाराच्या मुळाशी जाऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी शेतक-यातून होत आहे.