पंधराव्या वित्ततून ग्रामपंचायती होणार मालामाल

पाच वर्षात पाचशे कोटी निधी मिळण्याची शक्यता 

रत्नागिरी:- थेट ग्रामपंचायतीला निधी मिळत असल्यामुळे हिवरे बाजारसारखी गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. जिल्ह्याला पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पाच वर्षात सुमारे पाचशे कोटीहून अधिक निधी मिळू शकतो. पहिल्या टप्प्यात 64 कोटी रुपये मिळाले असून गेल्या महिन्यात 32 कोटी रुपयांची भर पडली आहे. मार्च अखेरीस त्यात आणखी 32 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे.

महिन्याभरापूर्वीच रत्नागिरी जिल्ह्यातील साडेतीनशे ग्रामपंचायतींमध्ये नवे सरपंच, उपसरपंच निवडण्यात आले आहेत. निवडणुकीमुळे पंधराव्या वित्त आयोगातील कामांची कार्यवाही थांबली होती. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. यावेळच्या निवडणुकीत बहूतांश ठिकाणी तरुण उमेदवारांना संधी मिळालेली आहे. पंधरावा वित्तचे आराखडे तयार झाले असून त्याची कार्यवाही करण्याचे गावस्तरावरील प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. ग्रामपंचायत कायदे, कार्यपद्धती, अर्थकारण, सरकारी योजना, ग्रामसेवक यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी हे प्रशिक्षण घेत आहेत. कोरोनामुळे हा निधी मिळणार की नाही याबाबत साशंकता होती; परंतु कोरोना सुरु लागल्यानंतर 64 कोटी रुपये जिल्हा परिषदेला मिळाले. पाठोपाठ गेल्याच महिन्यात 32 कोटी 72 लाख 63 हजार रुपयांचा निधी अबंधित कामांसाठी देण्यात अले आहेत. यामध्ये ग्रामपंचातीकडे 26 कोटी 18 लाख तर पंचायत समिती व जिल्हा परिषदेला प्रत्येकी 3 कोटी 27 लाख मिळतील. एकुण 96 कोटी रुपये जिल्हा परिषदेकडे असून त्यातील एकही रुपया खर्ची पडलेला नाही. निवडणुकीमुळे हे पैसे बँकेतच पडून आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार दरवर्षी साधारण 150 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला मिळेल अशी शक्यता आहे. त्यानुसार पाच वर्षात हा निधी काही कोटींच्या घरात जाईल. मार्च अखेरीस 32 कोटी रुपये शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. ते लवकरच मिळतील, अशी अपेक्षा ग्रामपंचायत विभागाला आहे. या निधीमधून स्वच्छता, पाणीपुरवठा योजनांसह रस्ते, पाखाड्या, नाविन्यपूर्ण उपक्रमातील विविध विकासकामे मार्गी लागणार आहेत. त्यामधूनच हिवरेबाजार, पाटोदासारखी गावे स्वयंपूर्ण होऊ शकतील.

दरम्यान, पंधराव्या वित्तचा निधी खर्ची करताना त्यात पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन पेंमेट सुविधा केलेली आहे. त्यासाठी सरपंच, ग्रामसेवकांचे विशेष प्रशिक्षण सुरु आहे. त्यांची डिजिटल साईनही घेण्यात येणार आहे. याचा लेखा-जोखा एका क्लिकवर मिळू शकतो.