हापूसच्या एका पेटीला विक्रमी लाखाचा भाव

रत्नागिरी:- ग्लोबल कोकण आणि मायको यांनी कोकणातील दहा बागायतदारांच्या मुहूर्ताच्या हापूसच्या पेटीचा लिलाव मुंबईत घेतला. त्यात पाच डझन हापूसची पेटी एका उद्योजकाने 1 लाख 8 हजार रुपयांने विकत घेतली. राजापूर तालुक्यातील बागायतदार बाबू अवसरेंची ती पेटी होती. उर्वरित दहा पेटींनाही चांगला दर मिळाला. यासाठी ग्लोबलचे संचालक संजय यादवराव यांच्यासह आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेतला होता.

विक्रमी दराने घेतलेली पेटी उद्योजक आणि सेंट अग्नेलो व्हीएनसीटी व्हेंचरचे राजेश अथायडे यांनी खरेदी केली. त्या लिलावाची सुरवात 10 हजार रुपयांनी झाली. यामध्ये पाच जणांनी बोली लावली.
बागायतदारासांठी बनवण्यात आलेल्या मँगोटेक प्लॅटफॉर्मची या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या निर्मितीसाठी श्री. अथायडेंंनी मायकोचे अभिनंदनही केले. या प्रसंगी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही 25 हजार रुपये दराने चार पेटी विकत घेतल्या. अथायडेंनी दुसरी पेटी 26 हजार रुपयांनी घेतली. रमेश भाईंनी 25 हजारला, सिंधुदुर्ग फार्मर प्रोड्युसरचे प्रसाद मालपेकर यांनी एक पेटी 15 हजाराला तर बांधकाम व्यावसायिक जगन्नाथ मोरे, आर्किटेक गणेश यादव, निलेश भोसले यांनी प्रत्येकी 12 हजार रुपयात आंबा पेटी विकत घेतल्या. या लिलावातून तीन लाख दहा हजार रुपये जमा झाले. त्यात सहभागी शेतकर्‍यांना प्रत्येकी 31 हजार रुपये मिळणार आहेत. या लिलावासाठी देवगड सौंदळमधील नाना गोखले, राजापूर पडवेमधील बाबू अवसरे, कुंभवडेतील पंढरीनाथ आंबेरकर, शिरसेमधील संजय शिर्सेकर, वाडा तिवरेमधील जयवंत वेल्ये, रत्नागिरीतील गौरव सुर्वे, उमंग साळवी, दीपक चव्हाण, तुषार साप्ते,  शेखर दळवी असे दहा शेतकरी सहभागी होते.
राजश्री यादवराव, सुप्रिया मराठे आणि सुनैना रावराणे या तीन महिला उद्योजकांनी एकत्र येत कोकणातील परिश्रमी 100 शेतकर्‍यांना संघटित केले. शेतकर्‍यांनी पिकवलेल्या हापूसचा ब्रँड बाजारात आणण्यासाठी ’मायको’ ने मँगोटेकची निर्मिती केली. याद्वारे हापूस ग्राहकांना थेट घरपोच दिला जाणार आहे. प्रत्येक पेटीवर विशेष क्यूआर कोड टाकला जाणार असून ग्राहकांना या आंब्याची लागवड कोणत्या शेतात आणि कधी केली याची माहिती मिळेल.