वाढत्या तापमानाचा हापूसला फटका

रत्नागिरी:- पाच दिवसाच्या अंतराने पारा 37 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यामुळे रत्नागिरी उन्हाचा ताप वाढला आहे. धगधगत्या उन्हाचा सर्वाधिक परिणाम हापूसवर होऊ लागला आहे. तयार झालेला आंबा भाजून गळू लागल्यामुळे बागायतदार त्रस्त झालेला आहे. कीडरोगांपासून वाचवण्यासाठी औषध फवारणीबरोबरच आंबा भाजू नये म्हणून उपाययोजना कराव्या लागत आहे. त्यावरील खर्चाची भर पडणार आहे.

दरवर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात पारा वर चढत जातो. यंदा फेब्रुवारीच्या अखेरीस कमाल तापमानात वाढ झाली आहे. 27 फेब्रुवारीला यंदाची उच्चांकी 37.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यानंतर पारा 32 ते 34 अंशापर्यंत होता; परंतु पुन्हा 4 मार्चला म्हणजे चारच दिवसांनी 37.2 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. या कालावधीत किमान तापमानही 19 ते 24 अंशापर्यंत होते. कमाल, किमान नोंदीमधील फरक 16 अंशाचा आहे. ही परिस्थिती पुढील पाच दिवस राहण्याची शक्यता असून आर्द्रतेत घट होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम वाटाणा ते सुपारीच्या आकाराच्या फळांच्या अवस्थेत असलेल्या आंब्यावर होत आहे. ताण वाढल्यामुळे फळगळ सुरू झाली असून आंब्यावर डाग पडले आहेत. भाजलेला आंबा वाया जात असल्याचे अनेक ठिकाणी आढळत आहे.

वातावरणातील चढ-उतारामुळे आधीच उत्पादन कमी असल्यामुळे बागायतदारांपुढे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा तयार झाला असून तो तोडण्यासाठी पावले उचलली जात आहेत; परंतु उन्हाच्या तापामुळे आंबा वाया जाऊ लागला आहे. याबाबत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान सल्ल्यानुसार आंबा वाचवण्यासाठी पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी आणि कागदी पिशव्यांचा वापर करावा, असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे.