जिल्हा आरोग्य विभागाच्या बेबंदशाहीला कंटाळून डॉ. लेले यांचा राजीनामा

रत्नागिरी:- जिल्हा आरोग्य विभागाच्या बेबंदशाहीला कंटाळून अखेर डॉ. अनिरुद्ध लेले यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. कोविड योद्धा म्हणून कोरोना काळात त्यांनी अनेक कोविड रुग्णालयांमध्ये प्रभावी काम केले. पावस प्राथमिक आरोग्य केंद्रातही तोंडी नियुक्तीवरून प्रामाणिक काम केले. तरीही जिल्हा आरोग्य विभागाने त्यांना दोन मेमो काढून त्यांचे खच्चीकरण केले. आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभाराला कंटाळून डॉ. लेले यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

पंचायत समितीच्या गुरुवारच्या (ता. 4) मासिक सभेमध्ये डॉ. लेले यांच्या नियुक्तीचा विषय गाजला. तालुक्यातील 28 गावांसाठी कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तेथे एकच आरोग्य अधिकारी होता. डॉ. अनिरुद्ध लेले यांची तिथे अधिकृत नियुक्ती झाली. पावस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे रजेवर गेल्यामुळे डॉ. लेले यांची जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी पावसला तोंडी नियुक्ती केली. लेखी स्वरूपात आपल्याला लवकरच कळविले जाईल, असेही आरोग्य विभागाने सांगितले होते; मात्र अजून त्यांना लेखी नियुक्ती दिली नव्हती. त्यात गजानन पाटील यांनी त्यांना पुन्हा कोतवडे येथे नियुक्ती देण्याची मागणी केली आहे.

जिल्ह्यात वैद्यकीय अधिकार्‍यांची वानवा आहे. अनेक पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागात आरोग्य सेवा देताना अनेक अडचणी येत आहेत. त्यात डॉ. लेलेंसारखे वैद्यकीय अधिकारी जनसेवेसाठी झोकून देऊन काम करीत असताना त्यांना विनाकारण अडचणीत आणण्याचे काम जिल्हा आरोग्य विभाग करीत असल्याची त्यांची खंत आहे. निवासी अधिकारी म्हणून नियुक्ती नसताना त्यांना दोन मेमो काढण्यात आले. एवढी प्रामाणिक सेवा करूनही आरोग्य विभाग दखल घेण्याऐवजी फटकारत असल्यामुळे त्यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याचे समजते.