बीएसएनएलसाठी अच्छे दिन; पोर्टेबिलीटीतून वाढले लाखो ग्राहक 

रत्नागिरी:- आयडीआय आणि वोडाफोन या दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरण बीएसएनएलच्या पथ्यावर पडले आहे. सुरवातीला नेटवर्कची समस्या निर्माण झाल्याने अनेक ग्राहक पोर्टेबिलीटीतून बीएसएनएलला मिळाले आहेत. 3 लाख बीएसएनएलचे मोबाईल ग्राहक असून काही महिन्यांत पाच ते सात हजार ग्राहकांची भर पडली आहे. बीएसएनएलला बर्‍याच वर्षांनी सुगीचे दिवस आले आहे. मात्र दुसरीकडे महामार्ग चौपदरीकरणात फायबर केबल तुटत असल्याने ब्रॉडबॅण्ड सेवेवर परिणाम होऊन ग्राहक घटले आहेत.  

भारत दूरसंचार निगम लि. (बीएसएनएल) कंपनी मोठ्या संकटात आहे. केंद्र शासनाने या कंपनीकडे दुर्लक्ष करीत खासगी कंपन्यांना मोठा हात दिला. त्यामुळे जिओ कंपनीने मोबाईल क्षेत्रामध्ये मोठी क्रांती करत अनेक कंपन्यांना अडचणी आणले. काही कंपन्या एकत्रित झाल्या, तर काही बंद पडल्या. बीएसएनएल कंपनीवरही याचा मोठा परिणाम झाला. मात्र या कंपनीचे जिल्ह्यासह कोकणात मोठे नेटवर्क आहे. जिल्ह्यात कंपनीचे सुमारे 524 मोबाईल टॉवर असून 3 लाखाच्यावर ग्राहक आहेत. ब्रॉडबॅण्डचे जिल्ह्यात 18 हजार ग्राहक होते. मात्र मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये कंपनीच्या फायबर केबलचे मोठे नुकसान झाले. यामध्ये अनेक ग्राहकांच्या जोडण्या तुटल्या. फायबर आणि कॉपरची केबल उपलब्ध होणे कठीण झाले आहे. लांब पल्ल्याच्या ग्राहकांना ही सेवा पुरवणे कठीण झाल्याने ती बंद पडली आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात 4 हजार ग्राहक कमी झाले आहेत.  

दुसरी जमेची बाजू म्हणजे आयडीआय आणि ओडा फोन एकत्रीकरण झाले आहे. त्याच्या ग्राहकांना सुरवातीला नेटवर्कची मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले. गैरसोय टाळण्यासाठी यातील अनेक ग्राहकांनी पोर्टेबिलीटीच्या माध्यमातून बीएसएनएलचे ग्राहक झाले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये सुमारे पाच ते सात हजार ग्राहक बीएसएनएल कंपनीला मिळाले आहेत. कंपनीसाठी ही एक समाधानाची बाब आहे. जिल्ह्यात फायबर टु होम या बीएसएनएलच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात याच्या 3 हजार जोडण्या आहेत. 50 ते 500 एमबीपर्यत आपल्या वापरानूसार जोडणी घेता येते.