सेक्स रॅकेटमधील स्थानिक म्होरक्या कोण? मोबाईल फोनद्वारे होणार उलगडा

रत्नागिरी:- रत्नागिरीतील फणशीबाग परिसरातील ओसवाल नगर येथे उघडकिस आलेल्या सेक्स रॅकेट नंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ज्यांना रत्नागिरी माहित नव्हती त्या व्यक्तींना रत्नागीरीत आणले कोणी? असा सवाल उपस्थित होत असून अटकेतील संशयित महिलेने तोंड बंद ठेवून तपासात अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांनी कॉल रेकॉर्ड मिळविण्याकरिता सीडीआर मागवल्याने आता मोबाईल फोनद्वारेच याचा उलगडा होणार आहे. जे व्यक्ती फोनद्वारे कॉन्टॅक्टमध्ये आले आहेत त्या साऱ्यांची पोलीस स्थानकात चौकशी होणार आहे.

रत्नागिरी शहरातील फणशीबाग परिसरातील एका बंगल्यात चालणार्‍या सेक्स रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी पर्दाफाश केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका पीडित युवतीची रॅकेट चालवणार्‍या व्यक्तींच्या ताब्यातून सुटका करण्यात आली. फणशी बाग येथील एका बंगल्यात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. बाहेरील जिल्ह्यातून मुली आणून त्यांच्या मार्फत सेक्स रॅकेट सुरू होते. या ठिकाणी रत्नागिरीतील अनेक उच्चभ्रू वस्तीतील लोकांची ये-जा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

हा प्रकार रत्नागिरीच्या संस्कृतीला न शोभणारा असून याविरोधात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याची पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.जे या प्रकारात सहभागी असतील अशांवर थेट गुन्हे दाखल करा असे आदेश ना.सामंत यांनी दिले आहेत.

दरम्यान यातील संशयित आरोपी पद्मिनबाई तुकाराम बादलवाड (वय-४३,रा.सोलापूर) व शिवाजी आनंदराव पाटील (कराड) हे एका बिल्डर च्या गाडीवर चालक असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले.रिअल इस्टेटचा बोर्ड बघून त्या दोघांनी त्याठिकाणी सपर्क केला. व आपल्याला रूम भाड्याने हवा आहे असे सांगून तो बंगला त्या चालकाच्या मदतीने भाड्याने घेतला. त्या  बंगल्याचे डीपॉझीट देऊन कमिशन पोटी एक महिन्याचे भाडे त्या चालकाला कमिशन दिल्याची माहिती आता पुढे आली आहे.

दरम्यान कॉन्टॅक्ट लिस्ट पोलिसांनी मिळवल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच काही मंडळींची पाचावर धारण बसली आहे. अनेकांनी बाहेरून कानोसा घेण्यास सुरुवात केली असून या रेकेटमध्ये आणखी किती जणांचा नंबर लागणार हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.