मासेमारी करणाऱ्या तरुणाभोवती बघता बघता पाण्याचा वेढा; नशिबानेच वाचला जीव

रत्नागिरी:- शहरानजीकच्या भगवती बंदर येथे पर्यटनासाठी आलेल्या कराड येथील तरुणाच्या त्याठिकाणी मासेमारी करण्याची हौस भरतीचे पाणी अचानक वाढल्याने चांगलीच भोवली. इतरांच्या मदतीने कसेबसे पाण्याबाहेर येत त्याने आपला जीव वाचवला. 

रविवारी सकाळी 7.30 वा.सुमारास हा तरुण कराडहून रत्नागिरीत आला होता.त्याच्या रत्नागिरीतील मित्रासोबत तो भगवती बंदर येथे मासेमारी करण्यासाठी गेला. यावेळी ओहोटी असल्याने पाणी कमी होते. त्यामुळे त्यांना समुद्रकिनारी पुढील भागात जाता आले. पौर्णिमा असल्याने पुढील तासाभरातच पाणी भरले. परत येण्याच्या मार्गावर पाणी आल्याने ते तेथेच अडकले. त्यातील एकाला पोहता येत असल्याने तो पाण्याबाहेर आला पण कराड येथील त्या युवकाला पोहता येत नसल्याने त्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली. दगडाचा आधार घेऊन तो युवक तेथेच थांबला होता.याची माहिती त्या मित्राने आपल्या अन्य मित्रांना फोनवरून कळवली. या मित्रांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ तेथे धाव घेतली. पोलिसांनी त्या युवकाला पाण्याबाहेर काढून त्याची सुटका केली. पाण्याबाहेर येताच मात्र ते दोन्ही युवक तेथून तत्काळ निघून गेले.