निवासस्थानाचे कुलूप उघडताच सापडल्या गहाळ झालेल्या महत्वाच्या फाईल्स

रत्नागिरी:- जिल्हा शल्य चिकित्सकांच्या शासकीय निवास्थानाचा प्रश्‍न पाच महिन्यानंतर कुलुप तोडुन निकाली निघाला. मात्र त्यानंतर झालेल्या शासकीय पंचनाम्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेसंदर्भात गहाळ झालेल्या महत्त्वाच्या फायली कपाटात मिळाल्याचा दावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केल्याने या प्रकरणाला वेगळाच आयाम मिळाला आहे. शासकीय दस्तावेज लपवून ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल आरोग्य संचालकांना देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. फुले यानी पत्रकाराना दिली.

या दरम्यान एक धक्कादायक माहिती पुढे आली. निवासस्थानी असेल्या एका कपाटाची झडती घेतली असता, त्यामध्ये कोरोना चाचणी प्रयोग शाळेसंदर्भातील गहाळ झालेल्या महत्त्वाच्या फायली मिळून आल्या. रुग्णालयाचे अधिकारी आणि डॉ. फुले यांनी त्याला दुजोरा दिला. सातारा रुग्णालयाच्या अहवालाचा संदर्भ देत तो प्रस्ताव दिला होता. गेली अनेक दिवस या फाईलची शोधा-शोध सुरू होती. मात्र ती मिळून येत नव्हती. याबाबत बोल्डे यांना वारंवार विचारणा करूनही ती कोठे आहे ते त्यांनी सांगण्याचे टाळले. शासकीय दस्तावेज अशा प्रकारे आपल्या ताब्यात ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. याबाबत नोटिसही बजावली होती. मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आज कपाटात या शासकीय फायली सापडल्या आहेत.जिल्ह्यासाठी स्वतंत्र कोरोना चाचणी प्रयोग शाळा परवानगीशी संबंधित त्या मूळ फाईली आहेत.डॉ. अशोक बोल्डे यांची सोलापूरला बदली झाली होती. मात्र त्यांना नियुक्ती मिळत नव्हती. आता ते ठाणे जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत.