जिल्ह्यातील ६ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती

रत्नागिरी:- राज्य सरकारच्या गृह विभागाने राज्यातील ४३८ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती दिली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ६ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली असून तिघांची बदली पोलीस निरीक्षक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आली आहे. पदोन्नतीने पोलीस निरीक्षक झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत.
 

मंगळवारी सायंकाळी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पदोन्नतीची यादी जाहीर केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ६ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती मिळाली आहे. त्यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे रायसिंग पाटील यांची मुंबई शहर येथे बदली झाली आहे, तर रमेश तडवी यांची ठाणे ग्रामीण येथे. बडेसाहब नाईकवाडे यांची पिंपरी चिंचवड येथे तर  सुनिल पवार यांची ठाणे शहर येथे, अमरसिंह पाटील यांची मीरा‚भाइर्दर वसई विरार येथे, दिलीप कांबळे यांची मुंबई शहर येथे पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक म्हणून तेथे पदभार स्वीकारणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात तीन नवीन पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे येथून शैलजा बोबडे -सावंत यांची, जालना येथून प्रदीप पवार तर सांगली येथून मारुती जगताप यांची पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात नवे पोलिस निरीक्षक रत्नागिरी जिल्ह्यात हजर होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे रायसिंग पाटील यांनी रत्नागिरी शहरातील अनेक गुन्हे उघड केले होते. अनेक महत्वाच्या गुन्ह्यांचा तपास त्यांच्याकडे होता. त्या गुन्ह्यांमध्ये  त्यांनी अनेक आरोपी गजाआड केले होते. त्यांना पदोन्नती मिळाल्याने मंगळवारी पोलीस निरिक्षक अनिल लाड यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.