राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई
रत्नागिरी:-राजापूर शहरातील खडपेवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकुन १५ हजार ८९० रुपये किंमतीचा गोवा बनावट विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अधिक्षक डॉ.बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक व्ही.व्ही.वैद्य यांनी अवैध दारु विरोधात मोहीम सुरु केली आहे.
या अंतर्गत सातत्याने गावठी दारुधंदे व गोवा बनावटीच्या दारु साठ्यावर छापे टाकुन लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान राजापूर शहरातील खडपेवाडी येथे गोवा बनावटीचा विदेशी मद्याचा साठा केला असल्याची माहीती राज्य उत्पादन शुल्क विभागाला खब-यामार्फत मिळाली. यानुसार विभागीय उपायुक्त वाय.एम.पवार, अधिक्षक डॉ.बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक व्ही.व्ही.वैद्य यांच्या नेतृत्वाखाली भरारीपथक व लांजा कार्यालयाने संयुक्तपणे धाड टाकली. यावेळी मॅक्डाॅल १, इम्पिरियल ब्ल्यू व्हिस्की व इतर असा १५ हजार ८९० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवार दिनांक २० फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
ही कारवाई उपअधिक्षक व्ही.व्ही.वैद्य, लांजाचे निरिक्षक विक्रम मोरे, भरारी पथकाचे उपनिरिक्षक किरण पाटील, जवान निनाद सुर्वे, विशाल विचारे, मिलिंद माळी, सागर पवार यांनी केली. याप्रकरणी अरविंद खटावकर (वय-२४), रा.खडपेवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याच पद्धतीने गोवा बनावटीच्या व गावठी दारुधंद्यावर कारवाई सुरु राहील असा इशारा उपअधिक्षक व्ही.व्ही.वैद्य यांनी दिला आहे.