बेशिस्त कर्मचाऱ्यांवर प्रशासन उगारणार कारवाईचा बडगा

सीईओ आक्रमक; शिस्तीचे पालन करण्याची नोटीस

रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती इंदूराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या कार्यालयीन शिस्तीचे पालन करण्याबाबत सर्व पंचायत समित्यांना परिपत्रक जारी केले आहे.

तालुकास्तरीय आढाव्या दरम्यान काही तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली असता, कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. सदर बाब योग्य नाही. ग्रामसेवकांच्या सदरच्या वर्तनामुळे ग्रामस्थांमार्फत ब-याच वेळेस विनाकारण तक्रारी प्राप्त होऊन शासकीय कार्यालयाची प्रतिष्ठा मलीन होत आहे. तसेच ब-याच ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक, कर्मचारी संबधीत गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांची परवानगी न घेता अथवा कार्यालयास न कळविता जिल्हा परिषद मुख्यालयात त्यांचे वैयक्तीक कामानिमित्त उपस्थित असतात अशी देखील बाब निदर्शनास आली आहे. 

 सदर बाबत यापुर्वी देखील संबधीतांना समज देणेबाबत कळविण्यात आलेले आहे. तरी देखील ग्रामसेवक कर्मचा-यांचे वर्तनात सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. करीता ग्रामसेवकांना ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहणेबाबत पंचायत समिती स्तरावरुन सुचना देण्यात याव्यात अशा आशयाचे कार्यालयीन शिस्तीचे पालन करण्याबाबतचे एक परिपत्रक रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना जारी केले आहे. त्यामध्ये ग्रामसेवक त्यांचे वैयक्तीक कामानिमित्त जिल्हा परिषद कार्यालयात उपस्थित राहाणार असतील अथवा अन्य कारणाने ग्रामपंचायत कार्यालयात अनुपस्थित राहणार असतील ; तर त्यांचे अनुपस्थितीबाबत रजेचा अर्ज संबधीत पंचायत समिती कार्यालयास सादर करून रजा मंजूर करणे बंधनकारक राहील, ग्रामसेवक कार्यालयीन कामानिमित्त अन्य शासकीय कार्यालय अथवा अन्य कामानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय सोडणार असतील, तर तशी नोंद ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीमधील हालचाल नोंदवहीत करणे बंधनकारक राहील. तसेच अन्य कामानिमित्त ज्या शासकिय कार्यालयात भेट देणार असतील; त्या कार्यालयाकडील अभ्यागत नोंदवहीमध्ये त्याबाबतची नोंद करणे आवश्यक राहील, ग्रामसेवकांकडे एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा कार्यभार असल्यास, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहावयाचे दिवस व कालावधीबाबत ग्रामपंचायतीबाहेर तसा फलक लावण्यात यावा. तसेच अतिरीक्त कार्यभार असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहात असलेबाबतची नोंद हालचाल नोंदवहीत ठेवण्यात यावी व अन्य ग्रामपंचायतींच्या उपस्थिती नोंदवहीमध्ये उपस्थित असल्याबाबतची स्वाक्षरी करणेत यावी, ज्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक उपस्थित राहाणार नाहीत; त्या दिवसांकरीता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अन्य ग्रामपंचायत कर्मचा-यांची उपस्थिती अनिवार्य राहील. कोणत्याही परिस्थितीमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालय बंद राहणार नाही; याची दक्षता घेण्यात यावी, सर्व ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांना सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.समय -२०१६ / प्र.क्र .६२ / १८ (र.वका.) , दि.२४.०२.२०२० नुसार निर्देशीत केलेल्या कार्यालयीन वेळेत उपस्थित राहतील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.संकिर्ण -२०२० / प्र.क्र .७१ / १८ (र.व का.) दि.०८.१२.२०२० नुसार कार्यालयात कार्यालयीन पेहराव परिधान करून उपस्थित राहावे, तसेच ब-याच वेळेस ग्रामस्थांशी सुसंवाद नसल्याने संबधीतांबाबत तक्रारी प्राप्त होतात; करीता सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीमध्ये आलेल्या अभ्यांगतांना सौजन्याची वागणूक द्यावी व आपले ग्रामपंचायतीबाबत कोणतीही तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी. 

उपरोक्तनुसार पंचायत समिती अधिनस्त ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांना सुचना देण्यात याव्यात. तरी देखील संबधीतांचे वर्तनात सुधारणा न झाल्यास नियमानुसार संबधीतांवर कारवाई प्रस्तावित करणेत यावी. अशा सक्त सुचना रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड यांनी प्रत्येक पंचायत समिती गटविकास अधिका-यांना दिल्या आहेत.