बेकायदा दारू बाळगल्याप्रकरणी आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी

रत्नागिरी:- तालुक्यातील टिके येथे बेकायदा गावठीहातभट्टीची 10 लिटर दारु बाळगल्याप्रकरणातील आरोपीला न्यायालयाने मंगळवारी 3 वर्षे सक्‍तमजूरीची शिक्षा सुनावली. ही कारवाई 9 मार्च 2017 रोजी सायंकाळी 4 वा.सुमारास ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आली होती.

राजेंद्र ज्ञानेश्‍वर सुर्वे (42,रा.बागपाटोळे,रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.त्याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हेड काँस्टेबल विजयकुमार गुंडप्पा चावरे यांनी तक्रार दिली होती.त्यानूसार, राजेंद्र हा टिके येथे गावठी हातभट्टीची 10 लिटर दारु विक्रीसाठी आपल्याकडे बाळगून असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली होती.त्याआधारे ग्रामीण पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून त्याच्याकडील मुद्देमाल जप्त केला होता.याप्रकरणी राजेंद्रवर मुंबई दारुबंदी कायदा 65 ई अन्वये गुन्हा दाखल करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.हा खटला न्यायालयात सुरु होता.सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.प्रज्ञा तिवरेकर आणि अ‍ॅड जोग यांनी 5 साक्षिदार तपासले.त्यांनी केलेला युक्‍तीवाद ग्राह्य मानून  मंगळवारी या खटल्याचा निकाल देताना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्र.2 यांनी राजेंद्र सुर्वेला 3 वर्षे सक्‍तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली.