पंधराव्या वित्तचा निधी नियमानुसार खर्ची टाका: ना. सामंत

रत्नागिरी:-पंधराव्या वित्त आयोगातील निधी नियमानुसार खर्च झाला पाहीजे. ग्रामपंचायतींकडून आलेले आराखडे प्रत्येक गटविकास अधिकार्‍यांनी तपासून घेतले पाहीजे. त्यातील कामे नियमानुसार नसतील तर ती घेऊ नका, सरपंचांनीही त्यावर वाद घालू नयेत. याची माहिती प्रत्येक सरपंचांना होण्यासाठी याचे प्रशिक्षण दिले पाहीजे, अशा सुचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी नवीन सरपंच, उपसरपंचासह अधिकार्‍यांना महत्त्वाच्या सुचना दिल्या. ते म्हणाले, पंधराव्या वित्त आयोगाचे आराखडे तयार करण्याच्या नियमांचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. अनेकवेळा आराखडे बनवताना योग्य कामांचा समावेश होत नाही. त्यासाठी बीडीओंनी ते आराखडे तपासले पाहीजेत. काही वेळा कामे मंजूर न झाल्यामुळे सरपंच बीडीओंबरोबर वाद घालतात. नियमात नसेल तर ती टाळण्याचे धाडस बीडीओंनीही दाखवावे. तसेच सर्व सरपंचांना याचे प्रशिक्षण द्यावे.

निवळी ग्रामस्थांच्या प्रश्‍नासाठी मंत्री सामंत यांनी सकाळी साडेसात वाजता घटनास्थळी पाहणी केली. तेथील कटू अनुभव मांडतानाच गावातील सुर्यवंशीचे राजकारण मोडीत काढले पाहीजे असा सल्लाही त्यांनी दिला. याबाबत ते म्हणाले की, निवळी येथे शेतजमिनीची धुप होत आहे. त्याची पाहणी करण्यासाठी ग्रामस्थांना सकाळी बोलावले होते. साडेसात वाजता मी तिथे पोचलो आणि संवाद साधला. तिथे येण्यासाठी सर्वांना बोलावण्यात आले होते. काही उशिरा उठणारे होते, ते वेळत पोचले नाहीत. त्यांना उठवण्यासाठी तीन-चार माणसं नेमावी लागतील. नियोजन कार्यक्रम असतानाही मी वेळ दिला होता. मी गेल्यानंतर तिथे काहीजणं उशिरा पोचले आणि ग्रामस्थांचा रस्ताही त्यांच्याकडून अडवण्यात आला. हे योग्य नाही, समस्या सोडविण्यासाठी पक्षविरहीत काम केले पाहीजे. सगळीकडे शांतता ठेवण्यासाठी गावातील वातावरण बिघडणार नाही यासाठी या प्रकारचे राजकारण मोडीत काढले पाहीजे.