सभापती पदासाठी पाच नावे चर्चेत
रत्नागिरी:-जिल्हा परिषद पदाधिकार्यांमध्ये बदल करण्याची भूमिका पक्षाने घेतल्यानंतर आता इच्छुकांची घालमेल सुरू झाली आहे. अध्यक्षपदासाठी अण्णा कदम व विक्रांत जाधव तर विविध समिती सभापती पदासाठी चंद्रकांत मणचेकर, परशुराम कदम, स्वप्नाली पाटणे, पूजा नामे, रेश्मा झगडे यांची नावे चर्चेत आहेत.
ग्रामीण विकासाचे केंद्र असलेल्या जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापती यांचा पक्षाने ठरवून दिलेला पदाचा कालावधी मार्च महिन्यात संपुष्टात येणार होता. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुदतवाढ मिळणार अशी चर्चा होती. गुरूवारी रत्नागिरी येथे झालेल्या पक्षाच्या पत्रकार परिषदेत जिल्हा संपर्क प्रमुख सुनील मोरे यांनी पदाधिकारी बदल होणार असून, 25 फेब्रुवारीपर्यंत पदाधिकार्यांनी राजीनामा द्यावेत असा आदेश दिले असल्याचे जाहीर केले.आहे.
सेनेच्या 39 सदस्यांपैकी आतापर्यंत 34 सदस्यांना संधी मिळाली आहे. पक्षांतर्गत पदाधिकारी निवडीबाबत काही निर्णय यापूर्वी झालेले आहेत. यामध्ये ज्यांना नियोजन समिती देण्यात आली आहे त्यांना एकही पद न देण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे उर्वरित पाच जणांना संधी मिळणार हे निश्चित झाले आहे. आतापर्यंत सेनेच्या स्वरूपा साळवी, रोहन बने, स्नेहा सावंत, संतोष गोवळे, प्रकाश रसाळ, विनोद झगडे, साधना साळवी, चारूदत्त कामतेकर, ऋतुजा खांडेकर, संतोष थेराडे, दीपक नागले, अरूण कदम, सुनील मोरे, महेश नाटेकर, महेश म्हाप, रजनी चिंगळे, ऋतुजा जाधव यांना पदाधिकारी स्वरूपात तर अरविंद चव्हाण, अनंत करंबेळे, दीप्ती महाडिक, सुचिता पवार, बाळकृष्ण जाधव, उदय बने, देवयानी झापडेकर, आरती तोडणकर, रचना महाडिक, माधवी गीते, मुग्धा जागुष्टे, पूजा आंबोळकर, भारती सरवणकर, सोनम बावकर यांना जिल्हा नियोजनच्या स्वरूपात पद मिळाले आहे. यामुळे आता रश्मी झगडे, स्वप्नाली पाटण, परशुराम कदम, चंद्रकांत मणचेकर, पूजा नामे, लक्ष्मी शिवलकर यांना पद मिळण्याची शक्यता आहे.
अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू यांचे नाव चर्चेत आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीतून सेनेत दाखल झालेल्या आ. भास्कर जाधव सध्या सेनेवर नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांचीही या पदासाठी वर्णी लागू शकते. उपाध्यक्ष किंवा शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर यांचे नाव चर्चेत आहे. त्याचबरोबर समाजकल्याण सभापतीपदी पर्शुराम कदम, महिला व बालकल्याण सभापती पूजा नामे, रश्मी जाधव तर बांधकाम समिती सभापती स्वप्नाली पाटणे यांची नावे चर्चेत आहेत.
राष्ट्रवादीच्या नेत्रा ठाकूर यांचे नाव चर्चेत
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. यामुळे जि. प.मध्येही सेना, राष्ट्रवादीसोबत घेणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, उलट-सुलट चर्चा सुरू आहे. सभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या नेत्रा ठाकूर यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.