लॉकडाउननंतरही घरपट्टी वसुलीचा टक्का घसरलेलाच 

रत्नागिरी पालिका; 14 कोटीचे उद्दिष्ट, वसूली केवळ 6 कोटी

रत्नागिरी:- घरपट्टी माध्यमातून कोट्यवधीचा महसुल मिळणार्‍या रत्नागिरी पालिकेला लॉकटाउन नंतर देखील मोठा फटका बसला आहे. यंदा सुमारे 14 कोटी 15 लाख वसुलीचे उद्दिष्ट पालिकेसमोर होते. मात्र  आतापर्यंत फक्त 5 कोटी 99 लाखाच्या दरम्यान वसूली झाली आहे. लॉकडाउनमुळे घरपट्टी वसुलीचा टक्का गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरलेलाच आहे.

शहरात सुमारे 27 हजार 729 इमलेधारक आहेत. पालिकेकडून विविध करांसह दरवर्षी घरपट्टी वसूल केली जाते. घराच्या स्क्वेअरफुटावर पालिका मालमत्ता विभागाचे कर्मचारी सर्व्हे करून घरपट्टी निश्‍चित करतात. त्यानुसार गेल्यावर्षी 2018-19 या 9 कोटी 89 लाख रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 6 कोटी 41 लाख वसूल झाले होते. सुमारे 80.11 टक्के वसुली झाली होती. अनेक इमलेधारकांनी घरपट्टी थकविली आहे. त्यांच्यावर पालिकेने कारवाई केली आहे. काही थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध केली होती. काहींच्या घराला सील ठोकली होती. गेल्यावर्षीची थकबाकी आणि यंदाची घरपट्टी धरून 14 कोटी 15 लाखाची वसुलीचे उद्दिष्ट पालिकेसमोर आहे.
 

कोरोना महामारीचे मोठे संकट देशावर आले. त्यामुळे देशात पाच टप्प्यात लॉकडाउन करण्यात आले. सुमारे अडीच महिने लॉकडाउनमध्ये गेल्याने पालिकेच्या घरपट्टी वसुलीवर याचा मोठा परिणाम झाला. लॉक डाऊन नंतर देखील पालिकेच्या घरपट्टी वसुलीवर फार मोठा फरक पडलेला नाही. 14 कोटी 15 लाखांपैकी 5 कोटी 99 लाखच वसूल झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत घरपट्टी वसुली घसरली आहे. शासनाने सर्वांनाच सवलत दिल्याने पालिका वसुलीसाठी सक्तीही करू शकत नसल्याने पालिका आर्थिक अडचणीत सापडली आहे.