जिल्हा परिषदेसह पंचायत समिती पदाधिकारी बदल निश्चित 

25 फेब्रुवारी पर्यंत राजीनामे; निवडणुकीच्या दृष्टीने नियोजन

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेसह शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या पंचायत समिती पदाधिकार्‍यांच्या खांदेपालटावर शिक्कामोर्तब झाला. विषय समिती सभापतींसह पंचायत समिती सभापतींचे राजीनामे 25 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्षांक्षकडे सादर करण्याचे आदेश शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी दिले आहेत. त्यामुळे इच्छुकांकडून पुढील निवडीसाठी फिल्डींग लावण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती पदावर सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी यासाठी सव्वा-सव्वा वर्षाचा कालावधी निश्‍चित करण्यात आला. आतापर्यंत तिन टर्ममध्ये बहूतांश सदस्यांना संधी दिली गेली. पुढील वर्षाच्या सुरवातीला दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे शेवटच्या वर्षभरासाठी संधी मिळावी म्हणून इच्छुक सदस्य फिल्डींग लावून होते. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापुर्वी गतवर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, उपाध्यक्षपदी महेश नाटेकर, आरोग्य सभापतीपदी बाबू म्हाप, महिला व बालकल्याण सभापतीपदी रजनी चिंगळे तर समाजकल्याण सभापतीपदी ॠतुजा जाधव यांची नियुक्ती झाली होती. कोरोना कालावधीत टाळेबंदी झाल्याने विकासकामे करण्याची संधीच या पदाधिकार्‍यांना मिळाली नाही. शासनाने निधी कपातीचे धोरण स्विकारल्यामुळे त्यात भर पडली होती. या पदाधिकार्‍यांना मुदतवाढ मिळेल अशी शक्यता वर्तविली जात होती. महिन्याभरापुर्वी खासदार विनायक राऊत यांनी खांदेपालट होणार असल्याचा सुतोवाच केला. त्यानंतर गुरुवारी (ता. 11) शासकीय विश्रामगृहात जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी जिल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम यांच्यासह सर्व तालुक्यांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर पक्षादेशाप्रमाणे जिल्हा परिषद विषय समिती सभापती, पंचायत समिती सदस्य यांचे राजीनामे 25 फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणार असल्याचे सांगितले. हे राजीनामे अध्यक्ष रोहन बने यांच्याकडे द्यावेत अशा सुचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा 24 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतरच विषय समिती सभापती 25 फेब्रुवारीला राजीनामे देतील. राजीनामे घेतल्यानंतर पुढील 15 दिवसांनी नवीन पदांची निवड होऊ शकते.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे या निवडीत त्याचा प्रत्यय येणार की नाही याबाबत अजुनही निर्णय झालेला नाही. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 सदस्य असून त्यातील सात जणं हे आमदार भास्कर जाधव यांच्याबरोबर मनाने शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यात जाधव यांचे सुपूत्र विक्रांत यांचा समावेश आहे. उर्वरित सहा सदस्यांपैकी जिल्हा परिषदेत सभापतीपदाची कुणाला लॉटरी लागणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.