रत्नागिरी:- रत्नागिरीत सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. बहुतांश ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच विराजमान झाले असून सडामिर्यासह राई ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे.
ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर सर्वांचे आरक्षणाकडे डोळे लागले होते. हे आरक्षणदेखील जाहीर झाले आणि भल्याभल्यांचे पत्ते कट झाले. अनेक ठिकाणी खोतकी मोडीत निघाली. त्यामुळे नवीन चेहरे यावेळी ग्रामपंचायतीत विराजमान होणार हे स्पष्ट झाले होते. आरक्षण जाहीर झाल्यानंतर कौन बनेगा सरपंच? याचीच चर्चा सर्वत्र सुरू होती. काही ठिकाणी तर फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला. काही ग्रामपंचायतीत सदस्य फोडून सत्तेची समीकरणे बिघडवण्यात आली.
बुधवारी सरपंचपदाच्या उर्वरित जागांसाठी निवडणूक प्रक्रिया झाली. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने सरपंच निवडणुकीत बाजी मारली. मात्र शिवसेनेचे काळबादेवी, सडामिऱ्या हे गड ढासळले. यापूर्वीदेखील काळबादेवीत असाच शिवसेनेला दगाफटका मिळाला होता तर सडामिऱ्या ग्रामपंचायतीवर १५ वर्षांची असलेली सत्ता सडामिऱ्यावासियांनी उलथवून लावली. या ठिकाणी भाजपचे ४, शिवसेनेचे ३ व १ वंचित आघाडीचा उमेदवार निवडून आला. त्यामुळे सडामिऱ्यामध्ये काय होणार याची उत्सुकता साऱ्यांना लागली होती.सडामिऱ्या ग्रामपंचायतीत थेट शिवसेना विरूद्ध भाजप अशी लढत झाली. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुकांत उर्फ भाई सावंत यांनी आपले पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते तर शिवसेनेसमोर तगडे आव्हान ठेवत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विकास उर्फ धाडस सावंत यांनीदेखील भाजप पुरस्कृत पॅनेल रिंगणात उतरवले होते. त्यामुळे सडामिऱ्याची निवडणूक रंगतदार झाली होती. भाजपला ४ जागा मिळाल्या तरी फोडाफोडीचे राजकारण होईल, अशी शक्यता होती. मात्र या साऱ्या शक्यता फोल ठरल्या. सडामिऱ्या ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच व उपसरपंच विराजमान झाले आहेत.काळबादेवी ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील जोरदार रस्सीखेच सुरू होती.भाजपमधून बाहेर पडलेल्या सदस्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारली. सरपंचपदाच्या निवडणुकीतदेखील परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून सरपंच व उपसरपंचपद बाळ माने समर्थकांनी बाजी मारली आहे. सरपंचपदी तृप्ती पाटील तर उपसरपंचपदी सुमित भोळे यांची निवड झाली आहे.
तालुक्यातील राई ग्रामपंचायतदेखील कित्येक वर्षे भाजपच्या ताब्यात आहे. यावेळीदेखील राई ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. सरपंच, उपसरपंचपदीदेखील भाजपचेच उमेदवार निवडून आले आहेत.
शेवटच्या क्षणी काही ठिकाणी सदस्यांनी इकडून तिकडे उड्या मारल्याने शिवसेनेच्या काही ग्रामपंचायती ताब्यातून गेल्या असल्या तरी तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व मिळवले आहे. त्यामध्ये बसणी, कापडगांव, खानू, दांडेआडोम, पानवल, कोळंबे, वरवडे, जांभरूण, खरवते, कर्ला, हरचेरी, झरेवाडी, कुरतडे, चिंद्रवली, कळझोंडी, गडनरळ, देऊड, गुंबद, खालगांव आदी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच व उपसरपंच विराजमान झाले आहेत.तालुक्यातील डोर्ले व रिळ या ग्रामपंचायतींमध्ये राजकीय पक्षांचे बॅनर बाजुला ठेवण्यात आले आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतीवर गाव पॅनेल पुरस्कृत उमेदवार निवडून आले असून गावपॅनेलचेच सरपंच, उपसरपंच निवडून आले आहेत.