जि. प. च्या आदर्श शाळा पुरस्काराची घोषणा

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाले असून रत्नागिरीतील चांदेराई नं. १ तर खेड तालुक्यातील गुणदे-तांबडसह एकूण २१ शाळांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढावा तसेच प्राथमिक शाळांमधील कमी झालेली पटसंख्या वाढावी यासाठी शासनस्तरावर विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. याच पार्श्वभूमीवर शासनाने आदर्श शाळा पुरस्कारदेखील सुरू केले. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक शाळांनी हे पुरस्कार मिळवले आहेत.

गेले १० महिने जिल्ह्यात कोरोनाचे संकट होते. त्यामुळे यावेळचे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर होणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत पुरस्कार जाहीर करण्यात आले.

या पुरस्कारांचे निकष शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी, उपस्थितीचे शेकडा प्रमाण, शाळा सिध्दी श्रेणी, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, शैक्षणिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक उठाव, गावाच्या मदतीने राबविलेला उपक्रम, शाळेतील उपक्रम, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी आदी निकष तपासले जातात. ज्या शाळा हे निकष पूर्ण करून आपली गुणवत्ता सिध्द करतात अशा शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड केली जाते.

बुधवारी शिक्षण व अर्थ सभापती सुनील मोरे यांच्या दालनात जिल्हा पातळीवरील निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वेक्षण केलेल्या शाळांचा निकाल घोषित करण्यात आला. त्यामध्ये कनिष्ठ प्राथमिक शाळांमध्ये ९ शाळांची निवड झाली आहे. जि.प. प्राथमिक शाळा पिंपळोली, मंडणगड, दापोली तालुक्यातील आसुद नं. २, खेड तालुक्यातील गुणदे-तांबड, चिपळूण तालुक्यातील खांदाटभाई, गुहागर तालुक्यातील शिवणे नं. २, संगमेश्वर लोवले नं. १, रत्नागिरी चांदेराई नं. १, लांजा हर्चे नं. ३, राजापूर कोदवली नं. ३ शाळांना आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाले आहेत तर गुहागर तालुक्यातील कुटगिरी नं. ३ व रत्नागिरी तालुक्यातील खालगांव नं. २ या शाळांना विशेष शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे.

वरिष्ठ प्राथमिक शाळांमध्ये एकूण १० शाळांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात पूर्ण प्राथमिक शाळा कुंबळे, दापेाली आसुद नं. १, खेड असगणी नं. २, चिपळूण गोंधळे नं. १, गुहागर साखरी बुद्रुक, संगमेश्वर कोंडगांव बुद्रुक केंद्र, साखरपा नं. १, रत्नागिरी आगवेतर्फे फुणगूस, लांजा आंजणारी मराठी व राजापूर पेंडखळे नं. २ या पूर्ण प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाले आहेत. तर खेड तालुक्यातील आस्तान नं. १ या शाळेला विशेष शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे.

आदर्श शाळांपाठोपाठ आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कारदेखील जाहीर झाले असून दापोली तालुक्यातील प्रवीण विनायक काटकर व संगमेश्वर तालुक्यातील मोहन रामचंद्र कनवजे यांना आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार जाहीर झाला आहे.