रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात सरपंच निवडणुकीत एका पाठोपाठ एक धक्कादायक निकाल समोर येत आहेत. मंगळवारी कोतवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीसाठी अनपेक्षित सेना भाजप युती झालेली असताना बुधवारी काळबादेवी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणूकित देखील सेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये युती झाली आहे. या ठिकाणी पहिल्या सव्वा वर्षांसाठी शिवसेना पुरस्कृत परिवर्तन पॅनलचा सरपंच विराजमान झाला आहे.
काळबादेवी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सेना, भाजप आणि गाव पॅनल असे तीन पक्ष समोरासमोर लढले. निकालात गाव पॅनलचे सर्वाधिक 3 उमेदवार विजयी झाले. भाजप 2 आणि सेना पुरस्कृत पॅनलचे 2 उमेदवार विजयी झाले. निकालानंतर कोण होणार काळबादेवीचा सरपंच या बाबत उत्सुकता होती.
सरपंच निवडीबाबत सस्पेन्स असताना मंगळवारी रात्री अचानक नाट्यमय घडामोडीनंतर सेना आणि भाजप युती करण्याचा निर्णय घेण्यात आला. अचानक झालेल्या या युतीमुळे अनेकांना धक्का बसला आहे. पहिल्या सव्वा वर्षांसाठी सेना पुरस्कृत परिवर्तन पॅनलच्या तृप्ती पाटील या सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत तर उपसरपंच पदावर सुमित भोळे यांची नियुक्ती झाली आहे. पुढील पाच वर्षांचा फॉर्म्युला युतीच्या बैठकीत निश्चित करण्यात आला आहे.