राज्यात परिवर्तनाचा प्रश्नच नाही; सरकार पाच वर्षे पूर्ण करणार

रत्नागिरी:- महाराष्ट्रा सरकार परिवर्तनाचा प्रश्‍नच उद्भवत नसल्यामुळे नारायण राणेंच्या वक्तव्याकडे मी कोणत्याही दृष्टीकोनातून पाहत नाही. महाविकास आघाडी पाच वर्षे पुर्ण करेल कारण यावर शरद पवार आणि सोनिया गांधी यांचा आर्शिवाद आहे. त्यामुळे कुणाच्या पायगुणाचा लाभ होणार नाही, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सिंधुदुर्गवर दौर्‍यावर आले आहेत. त्यांच्या पायगुणामुळे महाराष्ट्रत सत्तांतर होईल असे वक्तव्य भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केले होते. त्यावर विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. शिवसेनेचे उपनेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री सामंत यांनीही पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना प्रतिक्रिया देत राणेंच्या वक्तव्यामुळे काहीच फरक पडत नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, महाराष्ट्रात परिवर्तन होणार नाही. महाविकास आघाडी भक्कम आहे. यावर खासदार शरद पवार, सोनिया गांधी यांचे आर्शिवाद असल्यामुळे यावर कसलाही परिणाम होणार नाही. तसेच कुणाच्या पायगुणामुळे लाभ होईल असेही नाही.
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर मंत्री सामंत म्हणाले, जे सरकार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला 75 दिवस होऊन सूद्धा कोणताही ठोस निर्णय घेऊ शकत नाही. ते देशातील महागाईचा प्रश्न सोडविण्यासाठी किती गंभीर आहे हा मोठा प्रश्नच आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढ थांबली पाहिजे. शिवसेनेने महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलने केली. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर वाढवले आहेत, ते पुर्ववत केले पाहीजेत.