वीस दिवसांत 4 हजार 626 जणांना कोरोना लसीकरण

रत्नागिरी:- कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहिम तिव्र करण्यात आली असून जिल्ह्यात नऊ तालुक्यात शासकीय रुग्णालयांसह एका खासगी रुग्णालयातही लस दिली जात आहे. 16 जानेवारीपासून पुढे वीस दिवसात 4 हजार 626 लाभार्थींना कोरोना लस देण्यात आली. यामध्ये सर्वाधिक लाभार्थी हे कोरोना योध्दे आहेत. लसीकरण केंद्र अजुन वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. गेल्या आठ दिवसात कमी-अधिक प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. बाधितांबरोबरच त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासण्याही मोठ्याप्रमाणात केल्या जातात. अधूनमधून एखाद्या रुग्णाचा मृत्यू होत आहे; मात्र कोरोनाच्या भितीमधून जिल्हावासीय सावरु लागलेले आहेत. नेहमीप्रमाणे व्यवहार सुरळीत होत असून कोरोना लसीकरण सुरु झाल्यानंतर विश्‍वास वाढत आहे. 16 जानेवारीला जिल्ह्यातील पाच केंद्रांवर लसीकरण सुरु झाले. पहिल्या तीन दिवसात लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाला. पहिल्या टप्प्यात कोरोना योध्दयांना लस देण्यात आली. 23 जानेवारीनंतर लसीकरण केंद्र वाढविण्यात आली. प्रत्येक तालुक्यात ही सुविधा दिली गेली. त्यामुळे लस घेणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. आरोग्य विभागातील शासकीय यंत्रणांबरोबरच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्स यांनाही लस दिली जात आहे. अनेकांनी मानसिक तयारी सुरु केली असून पुढील टप्प्यात पोलीसांचा समावेश केला आहे. लसीकरणानंतर लाभार्थ्यांवर गैर परिणाम झालेला नाही. जिल्ह्यासाठी 16 हजार मात्रा आल्या आहेत. एका लाभार्थ्याला दोन मात्रा दिल्या जाणार आहेत. त्यामुळे आठ हजार व्यक्तिंना लस दिली जाऊ शकते. त्यादृष्टीने आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातुनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ही मोहीम यशस्वी ठरणार असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.