रत्नागिरीतील काळबादेवी, मिऱ्या, कोतवडे, नांदीवडे सरपंच निवड ठरणार लक्षवेधी

9 आणि 10 फेब्रुवारीला निवड, फोडाफोडीच्या राजकारणाला वेग 

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षणाच्या ‘लॉटरी’नंतर आता येत्या 9 व 10 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष सरपंच पद निवड प्रक्रिया घेतली जाणार आहे. 9 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील एकूण 53 ग्रामपंचायतींपैकी 28 तर 10 फेब्रुवारी रोजी 25 ग्रामपंचयतींत ही निवड केली जाणार असल्याचे तहसिलदार प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.  

तालुक्यातील काळबादेवी, मिऱ्या, कोतवडे आणि नांदीवडे येथील सरपंच निवड लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. काळबादेवी येथे गाव पॅनल सर्वात मोठा पक्ष असून या पॅनलला सेना की भाजप पाठिंबा देणार याकडे नजरा आहेत. मिऱ्या येथे देखील 2 अपक्षांच्या हाती सत्तेची दोरी आहे. कोतवडेत भाजप आणि सेनेला समसमान जागा असून 1 अपक्ष सत्तेची दिशा ठरवणार आहे. नांदीवडेत देखील भाजप पुरस्कृत गाव पॅनलला बहुमत असले तरी येथे फिदाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. 
 

ग्रामपंचायत निवडणूकीनंतर आता सरपंच निवडीसाठी गावोगावी सरपंचपदाची माळ गळ्यात घालण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी व विविध राजकीय पक्षांच्या, पॅनेलपमुखांकडे फिल्डिंग लावण्यात आली आहे. या निवडीचा कार्यक्रम प्रशासनस्तरावरून जाहीर करण्यात आला आहे. सरपंच व उपसरपंच निवडणूकीसाठी मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1964 मधील कलम 4 अन्वये सभेची नोटीस अध्यासी अधिकारी यांनी काढायची आहे. त्यानुसार होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेत होणाऱ्या या निवड प्रक्रियेसाठी प्रशासनस्तरावर 53  निवड अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.  दि. 9 फेब्रुवारी तालुक्यातील आगरनरळ, कोतवडे, चांदेराई, चवे, गणपतीपुळे, गावखडी, कशेळी, कासारी, हातखंबा, मिऱ्या, नांदिवडे, सोमेश्वर, नेवरे, ओरी, सैतवडे, शिवारआंबेरे, वरवडे, उक्षी, वाटद, राई, खेडशी, नाणीज, पाली, मजगांव, पावस, नाचणे, मिरजोळे, गोळप या ग्रामपंचायतींची सरपंच निवड होणार आहे.  

तर दि. 10 फेब्रुवारी रोजी गडनरळ, बसणी, हरचिरी, देवुड, डोर्ले, कापडगाव, कोळंबे, झरेवाडी, खालगांव, सडामिऱया, कुरतडे, नाखरे, चाफे, रिळ, खरवते, राई, गुंबद, भाट्ये, जांभरुण, कर्ला, कळझोंडी, पानवल, खानू, चिंद्रवली, दांडेआडोम, काळबादेवी या ग्रामपंचायतींत सरपंच निवड पकिया होणार आहे. संबधित ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी 10 ते 12 या वेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करणे, दुपारी 12 ते 1 वा. नामनिर्देसनपत्र छाननी, दु. 1 ते 2 वा. नामनिर्देशनपत्र मागे घेणे, दुपारी 2 वा. सरपंच निवड असा कार्यकम जाहीर करण्यात आला आहे.