वाशी मार्केटमध्ये एक डझन हापूसला दोन हजारपर्यंत भाव 

रत्नागिरी:- लांबलेला पाऊस, थंडीतील चढ-उतार यामुळे हापूसचा हंगाम यंदा लांबणीवर गेला आहे. यंदा जानेवारीच्या दुसर्‍या पंधरवड्यात हापूसच्या पेट्या वाशीत दाखल होत आहेत. रत्नागिरीतून दिवसाला दहा ते बारा पेटी आंबा जात आहे. थंडी अभावी कलमांना फुट नसल्यामुळे यंदा उत्पादन कमी राहील असा अंदाज आहे. सध्या वाशी मार्केटला दर्जानुसार हापूसचा दर एक हजार ते दोन हजार रुपये डझनला आहेत. तो बरेच दिवस टिकून राहील असा अंदाज आहे. सध्या वाशीमध्ये देवगडमधील पेट्यांची संख्या अधिक आहे.

यंदा हंगाम लांबलेला असताना समुद्र किनारी भागातील काही झाडांना पहिल्या टप्प्यात आलेला मोहोर फलदायी ठरणार आहे. वातावरणातील बदलांपासून आलेल्या मोहोराचे जतन केल्यामुळे त्याचे फळ जानेवारी महिन्याच्या अखेरीस मिळत आहे. पाऊस ऑक्टोबरअखेरपर्यंत लांबल्याने मोहोर येण्याची प्रक्रिया उशिराने सुरु झाली. पुढे थंडीतही जोर नव्हता. परिणामी मोहोर जून होऊन त्यात फलधारणाच झालेली नाही. जानेवारी महिना संपला तरीही मोहोरातून पाहिजे तशी फुट झालेली नाही. काही बागायतदारांनी नोव्हेंबर महिन्यात आलेला मोहोर व्यवस्थित जपल्यामुळे जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात हापूस बाजारात दाखल होऊ लागला आहे; परंतु ते प्रमाण अत्यल्प आहे. किनारी भागात ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान मोहोर आला. त्यानंतर पडलेल्या पावसापासून मोहोर ज्या बागायतदारांनी वाचवला, त्यांना काही प्रमाणात आंबा मिळत आहे. 15 जानेवारीनंतर आंबा पेटी वाशीला पाठविण्यास सुरुवात झाली. गतवर्षी कोरोनामुळे आंबा व्यावसायाल मोठा फटका बसला होता.

दरम्यान, रत्नागिरीतून हापूसच्या पेट्या अधिक प्रमाणात जाण्यासाठी 10 मार्चची वाट पहावी लागेल. सध्या वाशी मार्केटला सरासरी 60 ते 70 पेटी हापूस जातो. त्यात सर्वाधिक पेट्या देवगडमधील आहेत. वातावरणातील बदलांमुळे यंदा 15 मेपर्यंतचे आंबा उत्पादन कमीच राहील. माल कमी असल्यामुळे दर स्थिरावतील अशी शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. पहिल्या टप्प्यातील फळाचा आकार छोटा असतो. पाऊस आणि कमी थंडी यामुळे 150 ते 200 ग्रॅमपर्यंतचे फळ अधिक मिळत आहे.