प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतून जिल्ह्यात 9 कोटी 68 लाखांचे वाटप 

रत्नागिरी:- मातामृत्यु आणि बालमृत्यू रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेला रत्नागिरी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा आर्थिक वर्षात जिल्ह्यात 23 हजार 501 मातांना 9 कोटी 68 लक्ष 64 हजार रुपये वाटप करण्यात आले.

मातेला सकस आहार मिळवून सुदृढ बालक जन्माला यावे हा त्याचा उद्देश आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्वस्तरातील पहिल्या खेपेच्या गर्भवती मातांना या योजनेतून मिळणार्‍या रक्कमेतून सकस आहार घेण्यास प्रवृत्त केले जाते. महिलांना गरोदरपणाच्या कालावधित कराव्या लागणार्‍या मजुरीची भरपाई व्हावी, यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या माध्यमातून तीन टप्प्यात 5 हजार अनुदान पहिल्या टप्प्यातील मातांना दिले जाते.

जिल्ह्यात लॉकडाऊन काळात याची प्रभावी अंमलबजावणी झाली. एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या काळात 5 हजार 100 मातांना 2 कोटी 42 लक्ष 27 हजार रुपये इतक्या रक्कमेचा लाभ दिला गेला.

जिल्ह्यात 23 हजार 501 मातांची नोंदणी झाली असून लाभार्थीच्या बँक खात्यात 9 कोटी 68 लक्ष 64 हजार इतकी रक्कम जमा केली. शहरी भागात 2 हजार 641 मातांना एकुण 1 कोटी 6 लक्ष 69 हजार तर ग्रामीण भागात 20 हजार 860 मातांना एकुण 8 कोटी 61 लक्ष 95 हजार रुपये रक्कमेचा लाभ पहिल्या खेपेच्या गरोदर व स्तनदा मातांना देण्यात आले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अंमलबजावणी जास्त झाली आहे. यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका व आरोग्य सेवक यांच्यामार्फत योजनेचा प्रसार करण्यात आला होता. जिल्हयातील ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रातील पहिल्यांदा प्रसुती होणार्‍या मातांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी केले आहे.